Join us

अंगारकी संकष्टी चतुर्थीला सिद्धिविनायकाचे ऑफलाईन दर्शन बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:07 IST

ऑनलाईन क्यूआर काेड प्रणालीद्वारे नाेंदणी आवश्यकलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने आता देवस्थानेही पुन्हा ...

ऑनलाईन क्यूआर काेड प्रणालीद्वारे नाेंदणी आवश्यक

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने आता देवस्थानेही पुन्हा अलर्ट झाली आहेत. मुंबईतील प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिर न्यास समितीने २ मार्च रोजीच्या अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त भाविकांसाठी श्रीसिद्धिविनायक गणपतीचे ऑफलाईन दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अंगारकी संकष्टी चतुर्थी दिवशी मंदिर सकाळी ८ ते रात्री ९ पर्यंत केवळ ऑनलाईन क्युआर कोड प्रणालीमार्फत दर्शनासाठी उघडे राहील.

ज्या भाविकांनी ऑनलाईन सांकेतिक चिन्ह (क्यूआर कोड) आरक्षण (बुकिंग) केले आहे, त्याच भाविकांना एस. के. बोले मार्गावरील सिद्धी प्रवेशद्वार व काकासाहेब गाडगीळ मार्गावरील रिद्धी प्रवेशद्वार येथून दर्शन दिले जाईल. ज्या भाविकांकडे ऑनलाईन आरक्षण नाही, त्यांना दर्शन दिले जाणार नाही. ऑनलाईनद्वारे उपलब्ध होणारे सांकेतिक चिन्ह अहस्तांतरणीय आहे. व्हॉट्सअ‍ॅप, फोटो कॉपी आणि स्क्रिन शॉटद्वारे सांकेतिक चिन्हाची प्रत स्वीकारली जाणार नाही.

* अशी असेल दर्शनाची वेळ

दर्शनाची वेळ सकाळी ८ ते दुपारी १२ आणि दुपारी १२.३० ते रात्री ९ आहे. दुपारी १२ ते १२.३० या वेळेत दर्शन बंद राहील. ज्यांनी आगाऊ ऑनलाईन नाेंदणी केली आहे, मात्र त्यांना त्या दिवशी येणे शक्य नाही, अशांनी आपले आरक्षण रद्द करावे, जेणेकरून इतर भाविकांना दर्शन घेता येईल, असे सिद्धिविनायक मंदिर न्यास समितीने स्पष्ट केले.

................

.............