नवी मुंबई : आपल्याच खात्यातील अधिकारी व्यापाऱ्यांकडून हप्ते घेतात आणि व्यापारीही त्यांना हप्ते देतात, असा खळबळजनक गौप्यस्फोट अन्न व औषध प्रशासनाचे (एफडीए) आयुक्त महेश झगडे यांनी केला आहे. व्यापाऱ्यांना उपयुक्त ठरणाऱ्या अन्न व औषध प्रशासनाच्या कायदे पुस्तिकेचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. एपीएमसी येथे झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी मार्गदर्शन करताना झगडे यांनी ही कबुली दिली. द मुंबई ड्रायफ्रुट्स अँड डेट्स मर्चंट असोसिएशनच्या वतीने या कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले होते. एपीएमसी आवारात व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांना अन्न व औषध प्रशासनाच्या कायद्याची पुरेपूर माहिती असणे गरजेचे आहे. हीच गरज जाणून द मुंबई ड्रायफू्रट्स अँड डेट्स मर्चंटचे अध्यक्ष विजय भूता यांनी छोट्या स्वरूपातली कायदे पुस्तिका तयार केली आहे. मुख्य कायदे पुस्तिकेला छोट्या स्वरुपात तयार करण्यात आले आहे. या पुस्तिकेचे अनावरण एपीएमसीच्या मसाला मार्केट येथे करण्यात आले. याप्रसंगी पालकमंत्री नाईक यांच्यासह राज्याचे जलसंपदा मंत्री शशिकांत शिंदे, अन्न व औषध प्रशासनाचे अध्यक्ष महेश झगडे, आमदार नरेंद्र पाटील, फामचे अध्यक्ष मोहन गुरनानी आदी मान्यवर उपस्थित होते. अन्नामध्ये वापरल्या जाणाऱ्या काही तत्वांमुळे हरियाना पंजाब येथील अनेक नागरिक मोठ्या प्रमाणात कॅन्सरने पीडित झाले आहेत. या पार्श्वभूमीवर आरोग्यावर होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी व्यापाऱ्यांनी कायद्याच्या दिशेने उचललेले पाऊल कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार पालकमंत्री नाईक यांनी यावेळी काढले. तसेच माथाडींच्या घरांचा प्रश्न आणि वाढीव एफएसआय संदर्भात अलिकडेच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली आहे. त्यामुळे हे प्रश्न लवकरच मार्गी लागतील, असा आशावाद नाईक यांनी यावेळी व्यक्त केला. एपीएमसी प्रशासनाकडून व्यापाऱ्यांना १ टक्का सर्व्हिस चार्ज आकारणीचा निर्णय घेतला आहे. त्यास व्यापाऱ्यांचा विरोध असल्याने यासंदर्भात लवकरच बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन जलसंपदा मंत्री शशिकांत शिंदे यांनी दिले. तर हे मार्केट आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धेत टिकावे याकरिता तेथे आवश्यक ते बदल घडवले जाणार असून या जागेवर मोठे कॉम्प्लेक्स उभारण्याची सूचनाही त्यांनी दिली. आमदार नरेंद्र पाटील यांनी कायद्याचे पालन करणारे व्यापारी एपीएमसीमध्ये असून प्रकाशित झालेल्या पुस्तिकेच्या माध्यमातून योग्य मार्ग त्यांना सापडला असल्याची भावना व्यक्त केली.दरम्यान, पालकमंत्री गणेश नाईक व्यासपीठावर असताना झगडे यांनी आपल्याच खात्यातील अधिकाऱ्यांबाबत वादग्रस्त विधान केल्याने तर्कवितर्क लावले जात आहेत. असे असले तरी कार्यक्र माच्या शेवटी त्यांनी अधिकाऱ्यांना हप्ते देण्याची वेळ टाळण्यासाठी कायद्याने व्यापार करणे गरजेचे असल्याचा सल्ला दिला. (प्रतिनिधी)
अधिकारीच घेतात हप्ते
By admin | Updated: June 9, 2014 02:03 IST