Join us

500 भारतीय मच्छिमारांच्या सुटकेचे पाकिस्तानी अंतर्गत मंत्रालयाकडून अधिकृत पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2023 18:20 IST

आपल्या देशातील 666 मच्छिमार पाकिस्तान तुरुंगात आहेत, तसेच पाकिस्तानातील 83 मच्छिमार भारतामध्ये आहेत.

- मनोहर कुंभेजकरलोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई-पाकिस्तानातील भारतीय 500 मच्छिमारांची सुटकेचे पाकिस्तानच्या सरकारच्या अंतर्गत मंत्रालयाकडून  अधिकृत पत्र दिले आहे.आज मिळालेल्या अधिकृत माहिती नुसार पाकिस्तान सरकारच्या अंतर्गत मंत्रालया कडून जारी केलेल्या पत्रानुसार पहिली बॅच दि,11 मे 2023 रोजी 200 मच्छिमार जिल्हा तुरुंग मलिर, कराची येथून वाघा बॉर्डर वर पाठविण्यात येतील. दुसरी बॅच दि,2 जून 2023 रोजी 200 मच्छिमार पाठविण्यात येतील तसेच तिसरी बॅच 100 मच्छिमारांची 3 जुलै 2023  रोजी पाठविण्यात येईल असे पत्रात नमूद केले आहे.नॅशनल फिशवर्कर्स फोरमचे उपाध्यक्ष रामकृष्ण तांडेल यांनी ही शुभवर्तमानाची माहिती लोकमतला दिली.

आपल्या देशातील 666 मच्छिमार पाकिस्तान तुरुंगात आहेत, तसेच पाकिस्तानातील 83 मच्छिमार भारतामध्ये आहेत.त्यांची सुटका व्हावी म्हणून गेल्या 5-6 वर्षांपासून नॅशनल फिशवर्कर्स फोरम (एनएफएफ) प्रयत्न करीत आहेत.दोन्ही देशातील मच्छिमारांची सुटका करावी म्हणून दोन्ही देशांत दि. 13 एप्रिल- 2023 रोजी भारतामध्ये, अहमदाबाद व पाकिस्तान मध्ये कराची येथे मच्छिमार नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच पाकिस्तानचे पंतप्रधान मोहमद शरीफ यांना आपल्या देशांत तुरुंगात असलेल्या मच्छिमारांना त्वरित सोडण्यात यावे असे विंनती वजा पत्र दिले होते अशी माहितीतांडेल यांनी दिली.

परंतू दोन्ही देशाकडून  कहीही प्रतिसाद न मिळाल्याने नॅशनल फिशवर्कर्स फोरम ने याबाबत पाठपुराव्यासाठी दिल्ली फोरम कार्यालय दिल्ली येथे दि,4 मे 2023 रोजी सभा घेतली,त्यामध्ये पुढे आपण काय करावे अशी चर्चा सुरु असतांनाच पाकिस्तानातील मच्छिमार नेते व पाकिस्तान मिडीया  कडून अभूतपूर्व, आश्चर्यकारक गोड  बातम्या आल्या की, पाकिस्तानात अटकेत असलेल्या 666 मच्छिमारापैकी 500 मच्छिमारांची सोडण्याची अधिकृत तारीख  दि,13 मे रोजी  पाकिस्तान सरकार कडून घोषित केली होती अशी माहिती त्यांनी दिली.

मच्छिमारांची सुटका  होण्यासाठी पाकिस्तान इंडिया पिपल्स फोरम ऑफ पीस अँड डेमोकॉसी ( पीआय पीएफपीडी ),दक्षिण आशिया एकता गट, पाकिस्तान मच्छिमार संघटना  पदाधिकारी तसेच नॅशनल कमिशन हुमन राईट्स पाकिस्तानच्या अध्यक्ष्या  राबिया जवेरी यांनी मोलाचे सहकार्य केले अशी माहिती रामकृष्ण तांडेल यांनी दिली.