Join us  

विजेची अधिकृत जोडणी हीच वीज बचत आणि सुरक्षाही

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2019 2:09 AM

वीजजोडणी तसेच गणेशोत्सवाच्या कालावधीत मान्सून सक्रिय आहे. अशावेळी पावसामुळे धोके टाळण्यासाठी मंडळांनी वीज यंत्रणेची काळजी घ्यावी.

अशोक पेंडसे । मुंबई

राज्यातील सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांना सवलतीसह व वहन आकारानुसार ४ रुपये ५५ पैसे प्रतियुनिट वीजदराने महावितरणकडून तात्पुरती वीजजोडणी देण्यात आली आहे. मंडळांनी अधिकृत वीजजोडणी घेतल्याने त्याचा फार फायदा होतो. कारण वीज चोरून घेतली, तर त्याचा भार उर्वरित वीज ग्राहकांवर पडतो. महत्त्वाचे म्हणजे चोरून घेण्यात आलेल्या विजेमुळे मंडळांना धोका अधिक असतो आणि अधिकृत वीजजोडणी घेणे हीच विजेची बचत असून, हीच मंडळाची सुरक्षा आहे.

वीजजोडणी तसेच गणेशोत्सवाच्या कालावधीत मान्सून सक्रिय आहे. अशावेळी पावसामुळे धोके टाळण्यासाठी मंडळांनी वीज यंत्रणेची काळजी घ्यावी. मंडपातील वीज यंत्रणेचे अर्थिंग सुस्थितीत असल्याची खात्री करून घ्या. ते नसल्यास त्वरित अर्थिंग करून घ्यावे. वीज कंपन्यांच्या अभियंत्यांचे मोबाईल क्रमांक नोंदवून ठेवावेत. विजेच्या लघुदाब, उच्चदाब वाहिन्या आणि रोहित्रांचा गणेशोत्सवातील आणि मिरवणुकीतील देखाव्यांना स्पर्श होणार नाही, अशा सुरक्षित अंतरावर देखावे तयार करावेत. वीज सुरक्षेबाबत उपाययोजनांमध्ये तडजोड करू नये. उत्सवादरम्यान जेथून वीज घेणार आहात तेथील जोडणी तपासा. विजेच्या वाहिन्या लोंबळकत ठेवू नका. थेट जोडण्या घेऊ नका. अगदी छोट्या-छोट्या गोष्टी तपासा. कारण याच गोष्टी विजेची बचत करण्यासाठी मंडळांना मदत करणार आहेत.

प्रीपेड मीटरचा पर्याय : गणेशोत्सवासाठी दिली जाणारी वीज ही सवलतीमध्ये मिळत आहे. प्रीपेड मीटर हादेखील पर्याय आहे. परिणामी, येथे मंडळांना विजेच्या वापरावर नियंत्रण ठेवता येणार आहे. विजेच्या साहित्यात पावसाचे पाणी जाणार नाही, याची काळजी घ्या. कारण विजेच्या जंक्शनमध्ये पावसाचे पाणी गेले, तर मोठी हानी होते. त्यामुळे काळजी घ्यावी.

(लेखक वीज क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत) शब्दांकन : सचिन लुंगसे

टॅग्स :गणेश मंडळ 2019