Join us

‘सोल्जर्स लव्ह’ गाणे सैनिकांना अर्पण

By admin | Updated: August 15, 2014 02:26 IST

‘इंडो जिप्सीज बॅण्ड’चा कर्ताधर्ता नयन कवळेने आता स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून सैनिकांच्या वैयक्तिक आयुष्यावर आधारित ‘सोल्जर्स लव्ह’ हे गाणे तयार केले आहे

मुंबई : गेल्या वर्षी ‘लोकमत’च्या ‘रॉक द फट्टे’ रॉकबॅण्ड शोमध्ये सहभागी झाल्यानंतर आम्हाला प्रेरणा मिळाली आणि त्यातूनच आता सैनिकांसाठी गाणे तयार केल्याचे ‘इंडो जिप्सीज बॅण्ड’च्या सदस्यांनी सांगितले. ‘रॉक द फट्टे’ या शोमध्ये या ग्रुपने दुसरा क्रमांक पटकावला होता. ‘इंडो जिप्सीज बॅण्ड’चा कर्ताधर्ता नयन कवळेने आता स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून सैनिकांच्या वैयक्तिक आयुष्यावर आधारित ‘सोल्जर्स लव्ह’ हे गाणे तयार केले आहे. लष्करातील सैनिकांना अर्पण केलेल्या या गाण्याला यूट्यूबवर सध्या अनेक लाइक्स मिळत आहेत.‘दिल सुना है मोरे पिया ओ मेरे पिया’ असे बोल असलेल्या गाण्यात सैनिक देशाच्या रक्षणात दिवस-रात्र एक करत असतो, मात्र स्वत:च्या घराची, घरातील व्यक्तींची आठवण सदैव त्याला असतेच. सैनिकांच्या मनाचा वेध घेणारे गाणे या बॅण्डने तयार केले आहे. २०११ मध्ये दुर्गेश खोत, सौरभ शेट्ये, अमित म्हात्रे, आदित्य जैन, विनायक गवस या सहा जणांच्या चमूने मिळून ‘इंडो जिप्सीज बॅण्ड’ तयार केला. आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा, म्युझिकल शो, अशा अनेक लहान-मोठ्या स्पर्धांमध्ये सहभाग घेत २०१३ साली ‘रॉक द फट्टे’ विषयी माहिती मिळाली. आता बॅण्डला खऱ्या अर्थाने ‘लोकमत’च्या रॉक शोमुळे प्रसिद्धी मिळाली. त्यानंतरच नामवंत आयोजकांनी आपल्याला विविध कार्यक्रमांचे आमंत्रण दिल्याने या सगळ्याचे खरे श्रेय आपण ‘लोकमत’ टीमला देतो, असे नयन या वेळी म्हणाला. (प्रतिनिधी)