Join us
Daily Top 2Weekly Top 5

नाल्यात कचरा टाकणाऱ्यांवर गुन्हा

By admin | Updated: June 1, 2015 22:32 IST

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आयुक्त मधुकर अर्दड यांनी सोमवारी कल्याण पूर्व व डोंबिवलीतील मोठ्या नाल्यांच्या सफाईची पाहणी केली

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आयुक्त मधुकर अर्दड यांनी सोमवारी कल्याण पूर्व व डोंबिवलीतील मोठ्या नाल्यांच्या सफाईची पाहणी केली. त्यात आधारवाडी, गौरीपाडा, मिलिंदनगर, शहाड-अंबिकानगर, शिवाजी पथ, सितारा हॉटेल परिसरातील नाले आदींची पाहणी केली. त्या वेळी मिलिंदनगरच्या नाल्यात कचरा आढळून आल्यावर नाल्यांमध्ये कचरा टाकणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश त्यांनी संबंधित अभियंत्यांना दिले. अंबिकानगरच्या नाल्यात परिसरातील मार्बल फॅक्टरीच्या मालकांनी गाळ टाकल्याचे आढळून आले. त्यावरही आयुक्तांनी संबंधितांना तत्काळ नोटिसा देण्याचे आदेश ‘अ’ प्रभागाच्या प्रभाग अधिकाऱ्यांना दिले.महापालिका क्षेत्रात ५० किमीचे एकूण ४५ मोठे नाले येतात. त्यातील मुख्य नाल्यांची पाहणी करण्यात आली असून अद्याप ६० टक्के नालेसफाई पूर्ण झाल्याचे या वेळी आयुक्तांनी स्पष्ट केले. ही कामे १० जूनपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. महापालिका क्षेत्रात ७८ किमीचे मध्यम स्वरूपाचे नाले असून त्यांची साफसफाई करण्यासाठी निविदा काढण्यात आल्या असून त्यांची सफाई १४ अभिकरणामार्फत केली जाणार आहे. त्यासाठी १५ जून ही अंतिम मुदत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या वेळी त्यांच्यासोबत मलनि:सारण अभियंता रवी जौरस आणि जलअभियंता आदी अधिकारी उपस्थित होते.