Join us  

‘मुलुंड-गोरेगाव लिंक रोड’ मार्गात अडथळा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2023 12:54 PM

मुलुंड-गोरेगाव लिंक रोड  प्रकल्पाच्या कामात एल.बी.एस. रोड  सोनापूर चौक ते तानसा पाइपलाइन या पट्ट्यात विद्युत मंडळाच्या उच्च दाबाच्या वाहिन्यांमुळे अडथळा निर्माण झाला आहे.

मुंबई : मुलुंड-गोरेगाव लिंक रोड  प्रकल्पाच्या कामात एल.बी.एस. रोड  सोनापूर चौक ते तानसा पाइपलाइन या पट्ट्यात विद्युत मंडळाच्या उच्च दाबाच्या वाहिन्यांमुळे अडथळा निर्माण झाला आहे. वाहिन्यांचे स्थलांतर होत नाही तोपर्यंत प्रकल्पाचे काम पुढे सरकणे अवघड झाले आहे. वाहिनी हलवण्यास वीज कंपनीने संमती दिली असली तरी हे काम मार्गी लागेपर्यंत प्रकल्प काहीसा रखडणार आहे. प्रकल्पाच्या या टप्प्यात रस्ता रुंदीकरणाचे काम केले जाणार आहे. 

हा प्रकल्प पालिका राबवत आहे. पूर्व द्रुतगती महामार्ग ते खिंडीपाडापर्यंत गोरेगाव-मुलुंड लिंक रोड प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. २०१८ सालापासून या प्रकल्पाला सुरुवात झाली. लँडमार्क कॉर्पोरेशन प्रा.लि. या कंपनीला कामाचे कंत्राट देण्यात आले आहे. हा प्रकल्प विविध टप्प्यांत सुरू असून भांडुप सोनापूर ते तानसा पाइपलाइनदरम्यान प्रकल्पांतर्गत रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. याच ठिकाणी २२ के. व्ही. क्षमतेची  भूमिगत  विद्युत वाहिनी आहे. पालिकेची एमएसईबीसोबत बोलणी सुरू आहेत. सव्वा कोटी रुपयांचा  खर्च पालिका कंपनीला देणार आहे.  

या प्रकल्पामुळे २० मिनिटे वाचणार :  गोरेगाव-मुलुंड लिंक रोडचे पहिले दोन टप्पे डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचे पालिकेचे उद्दिष्ट आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुलुंड ते गोरेगावदरम्यानचा प्रवासाचा वेळ २० मिनिटांपर्यंत कमी होईल.  सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड, अंधेरी-घाटकोपर लिंक रोड आणि जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड यांसारख्या प्रमुख मार्गांवरी­­ल  गर्दी कमी करण्यासाठी पश्चिम द्रुतगती महामार्गावर गोरेगाव  ते पूर्व द्रुतगती महामार्गावरील मुलुंड असा दोन्ही  महामार्ग जोडण्यासाठी  हा प्रकल्प  महत्त्वाचा असून चार टप्प्यांत विभागला गेला असून त्यासाठी आठ हजार कोटी खर्च अपेक्षित आहे.

टॅग्स :मुंबईनागरी समस्या