Join us

कारचा पाठलाग करत महिलांबाबत अश्लील शेरेबाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई: वाकोला पश्चिम द्रुतगती महामार्गावरून कारने जाणाऱ्या महिलेचा पाठलाग करत, अश्लील हावभाव व शेरेबाजी केल्याचा प्रकार ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई: वाकोला पश्चिम द्रुतगती महामार्गावरून कारने जाणाऱ्या महिलेचा पाठलाग करत, अश्लील हावभाव व शेरेबाजी केल्याचा प्रकार गुरुवारी रात्री घडला होता. या घटनेचा व्हिडीओ पीडितेने मुंबई पोलिसांना ट्विट केल्यानंतर वाकोला व खेरवाडी पोलिसांनी याचा संयुक्तरीत्या तपास करण्यास सुरुवात केली आहे. आरोपीला गजाआड करण्यात येईल, असा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे.

पीडित महिला ही सांताक्रुझची राहणारी आहे. गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास ती कुटुंबासह कारने प्रभादेवीला राहणाऱ्या नातेवाइकांकडे निघाली होती. त्यावेळी जवळपास १० ते १५ मिनिटे मोटारसायकलवर बसलेल्या दोघांनी त्यांचा पाठलाग केला, तसेच त्यांच्या बद्दल अश्लील हावभाव व शेरेबाजी करण्यात येत होती. खेरवाडी पोलिसांची हद्द संपेपर्यंत हा प्रकार सुरू होता. वाकोला पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनयना नटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर प्रकार हा गंभीर असून आम्ही, तसेच खेरवाडी पोलीस पथक या प्रकरणी चौकशी करत आहेत. घटनास्थळीच्या सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी सुरू आहे, तसेच महिलेने शेअर केलेल्या व्हिडीओतून संशयितांचे फोटोही काढून त्यामार्फत तपास सुरू आहे. तक्रारदार महिलेच्या म्हणण्यानुसार, मोटारसायकलला नंबरप्लेट नव्हती. त्यामुळे त्या दोघांचा शोध घेण्यात तपास अधिकाऱ्याना बरेच अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र, तरीही आरोपीचा गाशा लवकरच गुंडाळला जाण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.