मुंबई : कुर्ल्यामध्ये २० क्षयग्रस्त रुग्ण आढळल्याची घटना ताजी असताना गोवंडी भागात एका आठवड्यातच ५३२ रुग्णांची नोंद झाली आहे़ यामध्ये २३६ महिला असल्याची धक्कादायक माहिती समाजवादीचे गटनेते रईस शेख यांनी आज स्थायी समितीच्या बैठकीत दिली़क्षयरोगावर नियंत्रण मिळवण्यात पालिका प्रशासन अपयशी होत असल्याचा आरोप त्यांनीहरकतीच्या मुद्द्याद्वारे स्थायी समितीत केला़ गोवंडी येथील पालिकेच्या शताब्दी रुग्णालयात गेल्या आठवड्यात बाह्य रुग्ण विभागात ५३२ रुग्णांनी येऊन तपासणी केली़ विशेषत: १६ ते ४० या वयोगटातील रुग्णांचा यामध्ये सर्वाधिक समावेश होता़ गोवंडी, शिवाजीनगर, मानखुर्द एवढेच नव्हे तर वाशी नाक्यावरूनही क्षयग्रस्त रुग्ण या बाह्य रुग्ण विभागात तपासणीसाठी आले होते़ मात्र या ठिकाणी येणाऱ्या मानद डॉक्टरांना पुरेशी सुविधा पुरविण्यात येत नाही़ क्षयरोगाचे उच्चाटन करण्यासाठी विशेष रुग्णालयांची संख्या वाढविण्यात यावी, अशी मागणी शेख यांनी केली़ हा हरकतीचा मुद्दा स्थायी समितीने राखून ठेवला आहे़ (प्रतिनिधी)
गोवंडीत क्षयग्रस्तांचा आकडा वाढला
By admin | Updated: December 25, 2014 01:20 IST