Join us  

रुग्णांची संख्या वाढली, कर्मचारी आहेत तेवढेच; रिक्त पदे भरली जात नसल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2023 12:26 PM

मुंबईत सर्वसामान्य गरीब आणि कामगार वर्गाला खासगी रुग्णालयातून उपचार घेणे परवडत नाही.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मुंबईत सर्वसामान्य गरीब आणि कामगार वर्गाला खासगी रुग्णालयातून उपचार घेणे परवडत नाही. त्यामुळे कमी दरात चांगली आरोग्यसेवा आणि उपचार मिळणाऱ्या महापालिका रुग्णालयातून उपचार घेणाऱ्यांची संख्या वाढत आहे.  मात्र, त्याचवेळी रुग्णसंख्येच्या मानाने सध्या असलेली महापालिकेची रुग्णालये, दवाखाने, प्रसूतिगृहे अपुरी पडत असल्याचे वास्तव म्युनिसिपल मजदूर युनियनने मांडली आहे. एकीकडे सेवानिवृत्त झालेल्या कामगार, कर्मचाऱ्यांची पदे भरली जात नसल्यामुळे सध्या असलेल्या कामगारांवर बोजा पडत असल्याची माहिती युनियनचे सरचिटणीस प्रदीप नारकर यांनी अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांना पत्र लिहून दिली आहे. 

पालिका रुग्णालयात दिवसेंदिवस वाढत असलेल्या रुग्ण संख्येमुळे उपलब्ध असलेल्या खाटा अपुऱ्या पडत असल्याचे नारकर यांनी म्हटले आहे. केईएम रुग्णालय, लोटिमस रुग्णालय, नायर रुग्णालय, कूपर रुग्णालय, राजावाडी रुग्णालय, भगवती रुग्णालय, भाभा रुग्णालय, शताब्दी रुग्णालयासह या मोठ्या रुग्णालयांसह छोट्या सर्व रुग्णालयांमध्ये जेवढे रुग्ण खाटेवर ठेवले जातात, त्यापेक्षा अधिक रुग्णांना खाटांअभावी व्हरांड्यात ठेवले जाते. पालिका रुग्णालयात रिक्त पदे भरण्याऐवजी कायम कामगार, कर्मचाऱ्यांकडून अतिरिक्त काम करून घेतले जात आहे. काही रिक्त पदे कायमस्वरुपी न भरता कंत्राटी कामगारांची भरती केली जात असल्याचेही पत्रात स्पष्ट केले  आहे.

अतिरिक्त आयुक्तांकडून अपेक्षा 

- महानगरपालिकेच्या रुग्णालये, आरोग्य खात्यात आपण रुग्णांना चांगल्या प्रकारची आरोग्य सेवा मिळावी व रुग्णालयातील सर्व विभाग, कक्षांची चांगल्या प्रकारे स्वच्छता राखण्यासाठी अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे अचानक भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी करीत आहेत. 

- यामुळे निश्चित पालिका रुग्णालयांच्या सेवेत चांगले बदल होतील, अशी अपेक्षा म्युनिसिपल मजदूर युनियनने व्यक्त केली आहे. याच पार्श्वभूमीवर रुग्णालयातील कर्मचारी, कामगार,  तंत्रज्ञ यांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या समस्या, अडचणी व मागण्या याबाबतही ते स्वतः लक्ष घालून त्या सोडवतील, अशी अपेक्षा युनियनकडून व्यक्त करण्यात आली आहे.

 

टॅग्स :हॉस्पिटल