लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुलींचा पदवी व पदव्युत्तर उच्च शिक्षणातील टक्का चांगलाच वाढत असल्याचे निरीक्षण यंदाच्या मुंबई विद्यापीठाच्या दीक्षान्त समारंभातील एकूण स्नातकांच्या आकडेवरून स्पष्ट होत आहे. ऑनलाईन पद्धतीने होणाऱ्या मुंबई विद्यापीठाच्या या दीक्षान्त समारंभात पदवी आणि पदव्युत्तर मिळून विविध विद्याशाखांतील एकूण १,९१,४९५ स्नातकांना पदव्या प्रदान करण्यात येणार आहेत. यामध्ये ९८,२६१ विद्यार्थिनी, तर ९३,२३४ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. पदवीसाठी १ लाख ६१ हजार ९३४, तर पदव्युत्तरसाठी २९ हजार ५६१ विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान करण्यात येणार आहेत.
मुंबई विद्यापीठाचा वार्षिक दीक्षान्त समारंभ आज, सोमवारी सकाळी ११ वाजता आभासी पद्धतीने आयोजित करण्यात आला आहे. या दीक्षान्त समारंभाच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल व विद्यापीठाचे कुलपती भगत सिंह कोश्यारी भूषवणार आहेत; तर सन्माननीय उपस्थिती म्हणून राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे असणार आहेत. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर, प्र-कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी आणि कुलसचिव डॉ. बळिराम गायकवाड यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम आभासी पद्धतीने पार पडणार आहे. आभासी पद्धतीने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण मुंबई विद्यापीठाच्या www.mu.ac.in या संकेतस्थळावर आणि https://www.youtube.com/channel/UCNQQByo2cn85ijVt2bf07pw या यूट्यूब लिंकवर करण्यात येणार आहे.
..... ...... ......
मुंबई विद्यापीठातून पदवी व पदव्युत्तर विद्यार्थी
वर्ष - एकूण विद्यार्थिसंख्या- विद्यार्थिनी संख्या - विद्यार्थिसंख्या
पदवी - १६१९३४- ७९८२६- ८२१०८
पदव्युत्तर - २९५६१- १८४३५- १११२६
..............
शाखानिहाय विद्यार्थिसंख्या
शाखा - एकूण विद्यार्थी - विद्यार्थिनी संख्या- विद्यार्थिसंख्या
ह्युमॅनिटीज- २००००१- १२०९०- ७९११
इंटरडिसिप्लिनरी- ८७६३- ५९२६- २८३७
कॉमर्स अँड मॅनेजमेंट - १११२४४- ६०९६५- ५०२७९
सायन्स अँड टेक्नॉलॉजी - ५१४८७-१९२८०- ३२२०७
एकूण- १९१४९५- ९८२६१- ९३२३४