Join us

जिल्ह्यात किनारपट्टीवर ४ नंबरचा बावटा

By admin | Updated: October 29, 2014 00:11 IST

येत्या ४८ तासात निलोफर चक्रीवादळ धडकण्याची शक्यता

रत्नागिरी/जैतापूर : रत्नागिरी जिल्ह्यात किनारपट्टीवर येत्या ४८ तासात निलोफर चक्रीवादळ धडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर किनारपट्टीवरील चक्रीवादळाचा इशारा देणारा ४ नंबरचा बावटा लावण्यात आला असून मच्छीमारांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. या काळात सुमारे ६० ते ७० कि.मी. वेगाने वारे वाहतील व जोरदार पाऊस पडेल, असा इशारा बंदर खात्याने दिला आहे. मुंबई परिसराला निलोफर वादळाचा धोका असल्याने या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील बंदर खात्याने मच्छीमारांना सावध केले आहे. हर्णै. गुहागर, जयगड, रत्नागिरी, आंबोळगड, नाटे, जैतापूर, तुळसुंदे, वेत्ये भागातील ग्रामस्थ आणि मच्छीमारांना याबाबत इशारा देण्यात आल्याचे रत्नागिरी, जैतापूरसह अन्य बंदर निरिक्षकांकडून सांगण्यात आले.येत्या ४८ तासात या परिसरात वादळाचा फटका बसण्याची शक्यता गृहित धरुन मच्छीमारांनी खोल समुद्रात जाऊ नये, असा इशारा दिल्याने जिल्ह्यातील रत्नागिरी, जयगड, हर्णै, नाटे, तुळसूंदे भागातील मच्छीमारी नौका नांगर टाकून किनाऱ्यावरच उभ्या ठेवण्यात आल्या आहेत. सुरक्षीत म्हणून तुळसूंदे बंदराचा वापर करण्यात आला असून रत्नागिरी भागातील मच्छीमारांनीही आपल्या नौका तुळसूंदे येथे ठेवल्या आहेत. तुळसूंदे - आंबोळगड - नाटे आदी भागातून मच्छीमारीद्वारे लाखोंची उलाढाल होते. मात्र वादळामुळे मच्छीमार नौका बंदरात उभ्या असल्याने लाखो रुपयांची उलाढाल थांबली आहे. वादळ शांत झाल्याचा इशारा येत नाही तोपर्यंत खोल समुद्रात न जाण्याचे मच्छीमारांनी ठरविले आहे. (प्रतिनिधी)इशाऱ्यानंतरही काही नौकांकडून मच्छिमारी निलोफर चक्रीवादळाचा इशारा देण्यात आल्यानंतर जिल्ह्यातील बहुतांश मच्छिमारी नौकांनी किनाऱ्यावरच थांबणे पसंत केले. मात्र, आज सकाळपासून वादळाची कोणतीही लक्षणे दिसत नसल्याने पहाटेच किनाऱ्यापासून जवळच्या समुद्र परिसरात काही नौका मच्छिमारीसाठी गेल्या होत्या. वादळी वातावरणामुळे मच्छीही किनाऱ्याच्या जवळ आल्याने जवळ मच्छिमारी करणाऱ्या नौकांना बांगडा चांगल्या प्रमाणात मिळाल्याचे स्पष्ट झाले. दुपारी या नौकांनी रत्नागिरीतील मिरकरवाडा जेटी गाठली. त्यानंतर बांगडा व म्हाकुल यांसारखी मच्छी टेम्पो व अन्य वाहनांतून विक्रीसाठी पाठविली गेली. सायंकाळीही वातावरण चांगले असल्याने रात्री उशिरापर्यंत अनेक मच्छिमारी नौका खोल समुद्रात जाण्याऐवजी किनाऱ्यापासून जवळच्या अंतरावर समुद्रात मच्छिमारी करीत होत्या. वादळाचा इशारा देऊनही मच्छिमारी सुरू असल्याने अन्य मच्छिमारी नौका चालकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत होते. सर्व मच्छिमारांना फोनद्वारे तसेच कार्यालयाबाहेर असलेल्या मनोऱ्यावर चार नंबरचा बावटा लावून वादळाची माहिती देण्यात आली आहे. मच्छिमारांनी या काळात मच्छिमारीसाठी समुद्रात जाऊ नये.