Join us  

लॉकडाऊनपासून गिरण्या बंद, 30 हजार कामगारांवर उपासमारीची वेळ

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2021 10:45 AM

या आंदोलनाला इंटक, एचएमएस, आयटक, सीटू, पीएलएफ आदी सर्वच केंद्रीय कामगार संघटनांच्या संयुक्त कृती समितीने पाठिंबा दिला आहे.

ठळक मुद्देएनटीसीच्या प्रश्नावर सर्व संघटना एकत्र आल्या असून, एनटीसी गिरण्या वाचवा आणि कामगार जगवा, हा नारा देत आंदोलन पुकारण्यात येणार आहे.

मुंबई : केंद्र सरकारच्या राष्ट्रीय वस्त्रोद्योग मंडळाच्या महाराष्ट्रासह देशभरातील गिरण्या लॉकडाऊन सुरू झाल्यापासून बंद आहेत. दीड वर्षे गिरण्या बंद असल्याने ३० हजार कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. एनटीपीसी गिरण्यांच्या प्रश्नांवर देशपातळीवर लढा उभारण्यासाठी राष्ट्रीय समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीचे नेतृत्व शिवसेना नेते आणि राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष सचिन अहिर यांच्याकडे देण्यात आले आहे.

मुंबईत टाटा, पोद्दार, इंदू मिल क्र.५, दिग्विजय तर मुंबई बाहेर अचलपूर आणि बार्शी अशा महाराष्ट्रात सहा गिरण्या बंद आहेत. तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, आंध्र, गुजरात, पश्चिम बंगालमधील एनटीपीसीच्या गिरण्या बंद आहेत.  या गिरण्यांमधील कामगारांचे इंटक, एचएमएस, सीटू, एआयसीयूटी, आयपीएफ आदी या मध्यवर्ती कामगार संघटनांच्या संलग्न स्थानिक संघटना नेतृत्व करीत आहेत. एनटीसीच्या प्रश्नावर सर्व संघटना एकत्र आल्या असून, एनटीसी गिरण्या वाचवा आणि कामगार जगवा, हा नारा देत आंदोलन पुकारण्यात येणार आहे.

या आंदोलनाला इंटक, एचएमएस, आयटक, सीटू, पीएलएफ आदी सर्वच केंद्रीय कामगार संघटनांच्या संयुक्त कृती समितीने पाठिंबा दिला आहे. लवकरच कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या सह्यांचे निवेदन केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल यांना पाठविण्यात येणार आहे. तसेच, १६ नोव्हेंबरपासून मुंबईच्या गिरण्यांमध्ये एनटीसी गिरण्या वाचवा, कामगार जगवा हे आंदोलन सुरू करण्यात येणार आहे. तसेच या प्रश्नावरील कामगारांच्या भावना केंद्र सरकारपर्यंत पोहोचविल्या जाणार आहेत. त्यासाठी २९ तारखेपासून सुरू होणाऱ्या संसदेचे हिवाळी अधिवेशनात आवाज उठविण्यासाठी राष्ट्रीय समन्वय समितीद्वारे खासदाऱ्यांच्याही भेटी घेतल्या जाणार असल्याचे राष्ट्रीय मिल मजदूर संघाने पत्रकात म्हटले आहे.

टॅग्स :मुंबईसचिन अहिर