Join us

अनिवासी भारतीयांची भारतात घर खरेदीला पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:06 IST

मुंबई : देशातील बांधकाम क्षेत्रामध्ये अनिवासी भारतीयांचा देखील मोठ्या प्रमाणात वाटा आहे. कोरोनामुळे नागरिकांच्या घराबद्दल असणाऱ्या अपेक्षा बदलल्या आहेत. ...

मुंबई : देशातील बांधकाम क्षेत्रामध्ये अनिवासी भारतीयांचा देखील मोठ्या प्रमाणात वाटा आहे. कोरोनामुळे नागरिकांच्या घराबद्दल असणाऱ्या अपेक्षा बदलल्या आहेत. यामुळे घर खरेदीसोबतच घरांबद्दलच्या आवडीनिवडीचा बदलता ट्रेंडदेखील रिअल इस्टेट क्षेत्र अनुभवत आहे. कोरोनाच्या काळात अनिवासी भारतीयांनीही भारतात घर खरेदीला पसंती दर्शविली आहे.

ॲनारॉक संस्थेच्या कंझ्युमर सेंटीमेंट सर्व्हेक्षण अहवालानुसार जवळपास ५३ टक्के अनिवासी भारतीय भारतात स्वतःच्या वापरासाठी घर खरेदी करण्यास इच्छुक आहेत. तर ४७ टक्के अनिवासी भारतीय हे गुंतवणुकीसाठी भारतात घर खरेदी करीत आहेत. त्यामुळे आता बांधकाम क्षेत्रात अनिवासी भारतीयांचा वाटादेखील विचारत घेतला जाऊ शकतो.

कोरोनाच्या काळात अनेक अनिवासी भारतीय भारतात परतले होते. अशावेळी त्यांनी भारतातील प्रमुख सात शहरांसोबत कुटुंबांच्या जवळपास असणाऱ्या शहरांमध्ये असणाऱ्या मालमत्तांमध्ये गुंतवणूक केली आहे. यापुढेही करण्याची शक्यता आहे.

लक्झरी घरे घेण्यास प्राधान्य

अनेक जण कायमस्वरूपी भारतात स्थायिक होऊ इच्छित आहेत. यातील ५० टक्के अनिवासी भारतीय हे १.५ कोटी रुपयांपर्यंत असणारी लक्झरी घरे घेऊ इच्छित आहेत. तर ३२ टक्के अनिवासी भारतीय हे ९० लाखांच्या आसपास असणारी घरे घेऊ इच्छित आहेत. तर ११ टक्के अनिवासी भारतीय हे मध्यम सेगमेंटमध्ये येणारी ४५ ते ९० लाखांच्या दरम्यान असणारी घरे घेण्यास इच्छुक आहेत. आणि केवळ ७ टक्के अनिवासी भारतीय ही परवडणारी घरे घेण्यास इच्छुक आहेत.

कोरोनाच्या काळात अनिवासी भारतीय भारतात घर खरेदी करू लागले आहेत. अनेक अनिवासी भारतीय हे बांधकाम क्षेत्र पुन्हा एकदा रुळावर येण्याची वाट पाहत होते. याआधी अनिवासी भारतीय हे भारतात केवळ औद्योगिकदृष्ट्या गुंतवणूक करण्यास इच्छुक होते. मात्र आता परिस्थिती बदलल्यामुळे प्रत्येक अनिवासी भारतीयांना भारतात घर घेण्याची इच्छा झाली आहे.

- अनुज पुरी (ॲनारॉकचे चेअरमन)