Join us

अनिवासी भारतीयांची भारतातील प्रमुख शहरांमध्ये मोठ्या घरांना पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:07 IST

मुंबई : कोरोनाच्या काळात घर खरेदीच्या बदललेल्या ट्रेंडमुळे अनिवासी भारतीयांनी देखील भारतात घर खरेदीला पसंती दर्शविली आहे. भारतात ...

मुंबई : कोरोनाच्या काळात घर खरेदीच्या बदललेल्या ट्रेंडमुळे अनिवासी भारतीयांनी देखील भारतात घर खरेदीला पसंती दर्शविली आहे. भारतात अनिवासी भारतीयदेखील घर खरेदीसाठी पुढाकार घेत आहेत. लक्झरी घरांच्या सोबतच मोठ्या घरांनादेखील पसंती मिळत आहे. ४८ टक्के अनिवासी भारतीय हे भारतात ३ बीएचके घर घेण्यास पसंती दर्शवत आहेत. २८ टक्के अनिवासी भारतीय २ बीएचके घर घेण्यास पसंती दर्शवत आहेत. तर २४ टक्के अनिवासी भारतीय हे भारतात ४ बीएचके घर घेण्यास पसंती दर्शवत आहेत.

मागील काही वर्षांमध्ये भारतात लक्झरी घरांची मागणी मोठ्या प्रमाणात घटली होती. नागरिकांचा परवडणारी घरे खरेदी करण्याकडे जास्त कल होता. कोरोनामुळे घर खरेदीचा ट्रेंड बदलला आहे. नागरिकांना वर्क फ्रॉम होममुळे लक्झरी व मोठ्या घरांची गरज जाणवू लागल्याने आता भारतीय बांधकाम क्षेत्रात लक्झरी घरांची मागणी वाढली आहे. अनिवासी भारतीयदेखील आता बंगळुरू, चेन्नई, पुणे, मुंबई या शहरांमध्ये घर खरेदी करण्यास प्राधान्य देत आहेत. चंदिगढ, कोची, सुरत, अहमदाबाद, लखनऊ या शहरांमध्येदेखील अनिवासी भारतीय घर खरेदी करत आहेत. घर खरेदी करताना विकासकाची विश्वासार्हता व ब्रँड हेदेखील लक्षात घेतले जात आहे.

अनिवासी भारतीयांनी २०२१ मध्ये शहरांनुसार केलेली घर खरेदीची टक्केवारी

बंगळूरु - २२%

पुणे - १८%

चेन्नई - १७%

मुंबई महानगर - १६%

दिल्ली एनसीआर - १५%

हैदराबाद - ८%

कोलकाता - ४%