Join us
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेमध्ये आता संपूर्ण प्लास्टीकबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2020 06:06 IST

रेल्वेमध्ये आता संपूर्ण प्लास्टीकबंदीची सुरुवात करण्यात येणार आहे.

मुंबई : रेल्वेमध्ये आता संपूर्ण प्लास्टीकबंदीची सुरुवात करण्यात येणार आहे. रेल्वे कार्यालय आणि इतर परिसरात दिसणारे बॅनर, प्लास्टीकच्या पोस्टरवर पूर्णपणे बंदी करण्यात येणार आहे. जाहिरातीसाठी वापरले जाणारे बॅनरही बंद होणार आहेत. त्याऐवजी कापडी बॅनर वापरण्याच्या सूचना रेल्वे मंडळाकडून प्रत्येक रेल्वे विभागाला देण्यात आल्या आहेत.नुकत्याच पर्यावरण मंत्रालयाकडून रेल्वे मंडळाला प्लास्टीक बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याप्रमाणे, रेल्वे मंडळाकडून भारतीय रेल्वेत संपूर्ण प्लास्टीकबंदी करण्यास सुरुवात होणार आहे. रेल्वे परिसरातील जाहिरातींसाठी कापडी बॅनर, पेपर यांसारख्या पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर केला जाईल. प्लास्टीक वस्तूंमुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे अशा वस्तू वापरणे बंद करून, पर्यावरणपूरक वस्तू वापरण्यावर भर देण्याच्या सूचना रेल्वे मंडळाने रेल्वे विभागाला दिल्या आहेत.स्वच्छ भारत अभियान दिनी भारतीय रेल्वेमध्ये ‘वन टाइम यूज प्लास्टीक’ला बंदी घालण्यात आली. ‘वन टाइम यूज प्लास्टीक’ला पर्यायी वस्तू वापरण्यास काही ठिकाणी सुरुवात केली. रेल्वे स्थानकावरील स्टॉलधारकांना आणि मेल, एक्स्प्रेसमधील विक्रेत्यांना प्लास्टीकचे कप, खाद्यपदार्थासाठी वापरण्यात येणारी प्लास्टीक पिशवी बंद करण्याच्या सूचना रेल्वे प्रशासनाने दिल्या आहेत.आयआरसीटीसीच्या वतीने विक्री केल्या जाणाऱ्या रेल नीरच्या प्लास्टीक बाटल्या, प्लास्टीक बॉटल क्रशर मशिनद्वारे चुरा केल्या जात आहेत. आता रेल्वे कार्यालयात, रेल्वे परिसरात वापरले जाणारे प्लास्टीक पोस्टर, बॅनर बंद केले जातील. त्याऐवजी पर्यावरणपूरक वस्तंूचा वापर केला जाईल.