Join us  

आता कैद्यांना मिळणार पाच रुपयांची पगारवाढ...; महागाईची झळ कारागृहातही

By मनीषा म्हात्रे | Published: August 19, 2023 11:26 AM

कारागृहाच्या भिंतीआड कैद असलेल्या बंद्यांच्या सुधारणा व पुनर्वसनावर शासनाकडून भर देण्यात येत असल्याने कारागृहातून सुटका झाल्यानंतर त्यांना समाजामध्ये सन्माननीय नागरिक म्हणून पुनर्वसन करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : वाढती महागाई लक्षात घेऊन कारागृहातील उद्योगांमध्ये काम करणाऱ्या बंद्यांना पगारवाढ लागू करण्याचा निर्णय कारागृह प्रशासनाने घेतला आहे. कारागृहातील कैद्यांना दिवसाला पाच ते दहा रुपयांची पगार वाढ लागू करण्यात आली आहे. याचा फायदा राज्यातील सात हाजाराहून अधिक कैद्यांना फायदा होणार असल्याचे कारागृह विभागाने सांगितले. 

कारागृहाच्या भिंतीआड कैद असलेल्या बंद्यांच्या सुधारणा व पुनर्वसनावर शासनाकडून भर देण्यात येत असल्याने कारागृहातून सुटका झाल्यानंतर त्यांना समाजामध्ये सन्माननीय नागरिक म्हणून पुनर्वसन करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहेत. यासाठी निरनिराळे व्यवसाय व कला यांचे शिक्षण देणारे विविध उद्योग कारागृहांमध्ये सुरु करण्यात आले आहेत. कारागृहातील सर्व उद्योग हे प्रशिक्षण आणि उत्पादन पद्धतीच्या धर्तीवर आहेत. कैद्यांना ते ज्या उद्योगामध्ये काम करतात त्या उद्योगाचे प्रात्यक्षिक व सिद्धांतातील ज्ञान मिळते.  कारागृहातून सुटल्यानंतर स्वतचा उदरनिर्वाह करण्यासाठी मदत त्यांना मदत होते..

विविध उद्योगांमध्ये काम करणाऱ्या कामगारांना ठराविक कालावधीनंतर वाढती महागाई लक्षात घेत पगारवाढ होत असते, त्याच धर्तीवर कारागृहातील उद्योगांमध्ये बऱ्याच दिवसांपासून काम करणाऱ्या बंद्यांना पगारवाढ देण्यात यावी अशी विनंती करण्यात येत होती. त्यानुसार कारागृह व सुधारसेवा विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांनी २० ऑगस्टपासून राज्यातील कारागृहातील उद्योगांमध्ये काम करणाऱ्या सर्व बंद्यांना पगारवाढ लागू करण्याचे आदेश दिले आहेत. 

दिवसाला किती पगार आणि वाढ...

     कैदी.                आधीचे दर.                पगार वाढ

१. कुशल बंदी        ६७ रुपये             ७४-रुपये 

२. अर्धकुशल बंदी.   ६१ रुपये          ६७ रुपये 

३. अकुशल बंदी      ४८ रुपये            ५३रुपये

4.खुल्या वसाहतीतील बंद्यांना  ८५     ९४ रुपये 

उद्योगांमध्ये किती बंदी...

राज्यातील सर्व कारागृहांमध्ये विविध प्रकारच्या उद्योगांमध्ये दैनंदिनपणे सरासरी ७००० बंदी काम करत असतात. यामध्ये पुरुष बंदी - ६३०० व महिला बंदी -३०० च्या आसपास काम करतात. या पगारवाढीचा लाभ अंदाजे ७००० बंद्यांना होईल.

यासाठी होतो उपयोग...

 बंदी कारागृहातील उद्योगांमध्ये काम करून आर्थिक मोबदला कमवतात  व त्यातून स्वतः साठी दैनंदिन गरजेच्या वस्तू कारागृह उपहारगृहातून खरेदी करतात तसेच स्वतःच्या कुटुंबियांना त्यांचे अडीअडचणी च्या वेळी  पोस्टाचे माध्यमातून मनिऑर्डर करतात ,काही बंदी सदर मिळालेल्या आर्थिक मोबदल्यातून वकिलांची फी भरतात अश्या अनेक कामांसाठी बंद्यांना स्वतः खर्च करता येतो त्यामुळे बंद्यांच्यामध्ये स्वावलंबी असल्याची भावना निर्माण होते.

राज्यातील कारागृहांमध्ये कुठले उद्योग सुरु 

सुतारकाम,लोहारकाम,शिवणकाम,चर्मकला,हातमाग,यंत्रमाग,बेकरी, कागदकाम ,फाउंड्री ,कार वॉशिंग सेंटर,इस्त्री 

 काम,गॅरेज ,उपहारगृहे ,जॉब वर्क -लॉक सेट मेकिंग व वायर हार्नेस ,मूर्तिकाम इत्यादी. 

काय काय तयार होते...

कारागृह उद्योगाद्वारे उत्पादित होत असलेल्या वस्तू बेडशीट्स ,होजिअरी वस्तू ,कार्पेट्स,हॉस्पिटल क्लॉथ ,डबल डंगरी ,टॉवेल, पंजादरी,लूमदरी,गालिचे,सतरंज्या ,चादर ,साडी,कैदी युनिफॉर्म ,चेअर मॅट्स ,नॅपकिन,सागवानी कपाटे,खुर्च्या,बुकसेल्फ ,जजेस चेअर,दरवाजे,खिडक्या ,टी पॉय , बंक बेड,स्टील फोल्डिंग कॉट्स ,किट बॉक्सेस,बॅरिकेट्स,आयर्न शिल्ड,विविध विभागांचे युनिफॉर्म्स,विविध शाळा कॉलेजेस चे युनिफॉर्म्स,राज्यातील शासकीय वसतिगृहाचे सर्व साहित्य ,अंकल बूट्स ,चप्पल,बेल्ट्स,बुक बायडिंग,वह्या ,नोंदवह्या, फाईल्स,साबण,फिनेल,डिटर्जंट पावडर,सर्व प्रकारची भांडी,शालेय साहित्य,मेणबत्ती ,अगरबत्ती इत्यादी वस्तू तयार होतात. 

शेती व्यवसाय ही जोरात...

        कारागृह शेती -कारागृह शेती हे कारागृह विभागाचे दुसरे महत्वाचे कार्य आहे. कारागृहातील बंद्यांना दैनंदिनपणे आहारासाठी लागणाऱ्या पालेभाज्या व अन्नधान्य गरजांच्या बाबतीत कारागृह स्वयंपूर्ण असावा यासाठी आधुनिक शास्त्रीय पद्धतीनुसार राज्यातील विविध कृषी विद्यापीठांच्या मार्गदर्शनानुसार कारागृहाच्या शेतमळ्याची पुनर्रचना व विकास याकडे जास्त लक्ष पुरविण्यात येत आहे. कारागृह शेती उद्योगामध्ये सर्व प्रकारच्या भाज्या ,अन्नधान्ये उत्पादित केली जातात. तसेच  कारागृह शेतीला पूरक व्यवसाय शेळी पालन,कुक्कुट पालन,मत्स्यपालन,गाई-गुरे पालन,मधुमक्षिका पालन,महाबीज बीजोत्पादन ,दुग्ध उत्पादन ,चंदन लागवड,साग लागवड,बांबू लागवड,गुळाचे गुऱ्हाळ ,मशरूम उत्पादन,बायोगॅस प्रकल्प इत्यादी सुरु करण्यात आलेले आहेत.

शासकीय कार्यालयांना कारागृहातील वस्तू 

       महाराष्ट्र शासनाच्या उद्योग,ऊर्जा व कामगार विभागाच्या दिनांक १/१२/२०१६ रोजीच्या शासन निर्णयानुसार सर्व शासकीय कार्यालयांना कारागृह उत्पादित होणाऱ्या ६६ वस्तू कारागृहाकडूनच खरेदी करणे बंधनकारक आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात वस्तूंची मागणी कारागृहास प्राप्त होते व त्यानुसार कारागृहातील सर्व कारखान्यांमध्ये उत्पादन सुरु राहते. यामुळे बंद्यांना सतत काम उपलब्ध राहते त्यातून बंद्यांना आर्थिक मोबदला मिळतो. बंदी सतत कामात व्यस्त राहिल्याने कारागृहातील इतर गैरप्रकारांना आळा बसतो. नियमितपणे काम केल्याने बंद्यांची कारागृहातील शिस्त व वर्तणूक चांगली राहते. त्यामुळे बंदयास शिक्षेतून माफी मिळते व कारागृहातून लवकर सुटका होण्यास मदत होते.

यांच्याकडे जबाबदारी 

  आधुनिक साधनसामुग्रीच्या सहाय्याने कारागृह उद्योगांचे नूतनीकरण करण्याचे व बंद्यांना आधुनिक उद्योगांचे प्रशिक्षण देण्याचे शासनाचे धोरण आहे. त्यानुसार कारागृहात नवनवीन आधुनिक उद्योग सुरु करण्याचे व रोजगार निर्मिती वाढविण्याची जबाबदारी डॉ जालिंदर सुपेकर,विशेष पोलीस महानिरीक्षक ,कारागृह मुख्यालय यांचेवर सोपविण्यात आलेली आहे.

दर तीन वर्षांनी मिळते वाढ

कैद्यांना दर तीन वर्षांनी दहा टक्के वाढ देण्याची तरतूद आहे.

टॅग्स :तुरुंग