Join us  

आता दोन दिवसांत होणार मोबाइल नंबरची पोर्टेबिलिटी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2019 5:52 AM

मोबाइल क्रमांक समान ठेवून सेवा पुरवणारी कंपनी बदलण्याबाबतचा म्हणजेच मोबाइल पोर्टेबिलिटीचा नवीन नियम १६ डिसेंबर पासून लागू होणार आहे.

मुंबई : मोबाइल क्रमांक समान ठेवून सेवा पुरवणारी कंपनी बदलण्याबाबतचा म्हणजेच मोबाइल पोर्टेबिलिटीचा नवीन नियम १६ डिसेंबर पासून लागू होणार आहे. यामुळे या प्रक्रियेला लागणारा आठवडाभराचा कालावधी कमी होऊन दोन दिवसांत ही प्रक्रिया कमी होणार आहे, अशी माहिती भारतीय दूरसंचार नियामक आयोगाने (ट्राय) दिली आहे.सध्या एमएनपी प्रक्रियेसाठी साधारणत: आठवडाभराचा कालावधी लागतो मात्र ट्रायच्या नवीन नियमांची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर हा वेळ अवघ्या दोन दिवसांवर येईल. मात्र जर ग्राहकाला दुसऱ्या सर्कलमध्ये नंबर बदलायचा असेल तर त्यासाठी चार दिवसांचा कालावधी लागेल. १३ डिसेंबर २०१८ रोजी ट्रायने काढलेल्या प्रसिध्दीपत्रकानुसार यंदा ११ नोव्हेंबरपासून या नियमांची अंमलबजावणी होणार होती, मात्र काही चाचण्यांसाठी विलंब झाल्याने आता या नियमाची अंमलबजावणी १६ डिसेंबरपासून होईल. एमएनपी प्रक्रिया एका दिवसात करावी, असा निर्णय सुरुवातीला घेण्यात आला होता. मात्र दूरसंचार मंत्रालयाशी केलेल्या चर्चेनंतर व त्यांच्याकडून आलेल्या सुचनेनंतर ही मुदत दोन दिवस करण्याचा निर्णय घेण्यात आला.>आंतरराष्ट्रीय कॉल टर्मिनेशन शुल्काबाबत चर्चा सुरूट्रायने आंतरराष्ट्रीय इनकमिंग कॉल टर्मिनेशन शुल्काबाबत चर्चा सुरु केली असून त्यावर मते मागवण्यात आली आहेत. गतवर्षी १ फेब्रुवारीपासून हे शुल्क ३० पैसे प्रति मिनिट करण्यात आले होते. त्यापूर्वी ते ५३ पैसे प्रति मिनिट होते. हे शुल्क आंतरराष्ट्रीय आॅपरेटर कडून देशातील ज्या स्थानिक नेटवर्कवर कॉल येतो त्यांना दिले जाते. याबाबत संबंधितांना ९ डिसेंबरपर्यंत सूचना पाठवता येतील व त्यावर काही आक्षेप असतील तर २३ डिसेंबर पर्यंत नोंदवता येतील असे ट्रायने स्पष्ट केले आहे.