Join us
Daily Top 2Weekly Top 5

आता अधिकाऱ्यांचे ‘माझे कार्यालय, माझी जबाबदारी’ अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनोत्तर काळात स्वत:ला सावरण्याबरोबरच राज्याचे प्रशासकीय कामकाज सुरळीत आणि गतिमान होण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनोत्तर काळात स्वत:ला सावरण्याबरोबरच राज्याचे प्रशासकीय कामकाज सुरळीत आणि गतिमान होण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने ‘माझे कार्यालय, माझी जबाबदारी’ अभियान राबविण्याचे ठरविले आहे.

राज्य सरकारच्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ अभियानाच्या धर्तीवर आता प्रशासकीय कामकाजाला गती देण्यासाठी राज्यातील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आपल्या कार्यालयात ‘माझे कार्यालय, माझी जबाबदारी’ अभियान राबवावे, असे आवाहन महासंघाचे मुख्य सल्लागार ग. दि. कुलथे, अध्यक्ष विनोद देसाई, सरचिटणीस विनायक लहाडे यांनी पत्रकाद्वारे केले. याअंतर्गत कार्यालयीन कामकाजातील अनावश्यक बाबींना कात्री लावून, तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या कार्यालयातील कार्यपद्धती अधिक सुलभ आणि पारदर्शक कराव्यात. नागरिकांना प्रत्यक्ष कार्यालयात येण्याची आवश्यकता पडणार नाही किंवा ते अशक्य असल्यास त्यांना कार्यालयात कमीत कमी वेळा यावे लागेल, अशी सुधारणा करावी. नागरिकांशी संबंध येणाऱ्या कामाची नेमकी कार्यपद्धती, तसेच आवश्यक कागदपत्रे काय आहेत याबाबतची माहिती विभागाच्या संकेतस्थळावर, कार्यालयात दर्शनी भागात सहज उपलब्ध असावी. उद्योग व व्यापार यांना पोषक वातावरण तयार करावे, लालफितीला फाटा देऊन नावीन्यपूर्ण कल्पनांना उत्तेजन द्यावे. शेतकरी, मजूर, अन्य गोरगरीब बांधव यांच्यापर्यंत शासकीय योजनांची माहिती पोहोचवावी. योग्य लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहोचवाव्यात, कुठल्याही कामाचे योग्य रीतीने नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

* साैजन्यपूर्ण वागणूक गरजेची

राज्यातील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी शासकीय नोकरी ही वेतन घेऊन समाजाची सेवा करण्याची संधी आहे, असे मानून कार्यसंस्कृती उन्नत करावी आणि आपल्या राज्याची विकासाची वाटचाल अधिक गतिमान करण्यात योगदान द्यावे, असे आवाहन महासंघाने केले आहे. प्रामाणिकपणे, नियमांच्या चौकटीत काम करणाऱ्या सहकाऱ्यांच्या मागे महासंघ कायम असेल. सहकारी, तसेच कार्यालयात येणाऱ्या अभ्यागतांशी सौजन्यपूर्ण वागणूक आवश्यक आहे, असेही पत्रकात नमूद आहे.