Join us

आता अवयव नव्हे, केवळ कर्करोगग्रस्त पेशी काढता येणार!

By स्नेहा मोरे | Updated: October 21, 2022 10:18 IST

कर्करुग्णांना अनेकदा उपचारादरम्यान बाधित अवयव काढावा लागतो. यामुळे त्यांना अनेक मानसिक तणावातून जावे लागते.

स्नेहा मोरेमुंबई : कर्करोगाविषयी अजूनही जनसामान्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कर्करुग्णांना अनेकदा उपचारादरम्यान बाधित अवयव काढावा लागतो. यामुळे त्यांना अनेक मानसिक तणावातून जावे लागते. मात्र, आता लवकरच कर्करुग्णांची ही भीती दूर होणार असून, भविष्यात केवळ कर्करोगग्रस्त पेशी काढून टाकण्याचे तंत्रज्ञान आले आहे. कर्करुग्णांचे आयुष्य सुकर करणाऱ्या या नव्या तंत्रज्ञानासाठी केईएम रुग्णालय प्रशासनाने पालिका प्रशासनाकडे प्रस्ताव पाठविला आहे.

खासगी रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांमध्ये अनेकदा कर्करोग पहिल्या टप्प्यात असतो. मात्र, पालिका रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांमध्ये कर्करोग काहीसा गंभीर टप्प्यात पोहोचलेला असतो. त्यामुळे रुग्णांचा बाधित अवयव काढून टाकावा लागतो. कर्करोगाच्या निदानामुळे आधीच खचलेल्या रुग्णांना यामुळे अधिकच्या मानसिक नैराश्याला सामोरे जावे लागते. 

प्रायोगिक वापराने सकारात्मक परिणामकेईएम रुग्णालयाला एका कंपनीने प्रायोगिक तत्त्वावर हे उपकरण दिले होते. त्यानुसार ४-५ रुग्णांवर या माध्यमातून उपचार करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे या रुग्णांची प्रकृती उत्तम असून, कोणताही दुष्परिणाम झाला नसल्याची माहिती कर्करोग विभागाच्या प्रमुख डॉ. शिल्पा राव यांनी दिली आहे. नुकतीच ३३ वर्षीय गृहिणीच्या स्तनाच्या कर्करोगावर ही उपचार पद्धती अवलंबिली. दोन महिन्यांपूर्वी त्यांना आजाराचे निदान झाले होते. यात कर्करोगग्रस्त पेशी काढण्यात आल्या.

असे आहे तंत्रज्ञान!     इंडो सायनाइन ग्रीन डाय उपचार पद्धतीत इंडो सायनो मेन ग्रीन या औषधाचे इंजेक्शन दिले जाते.      हे इंजेक्शन एखाद्या अवयवावर दिल्याने बाधित भागाचा रंग बदलतो.      त्यामुळे कर्करोग नेमका कोणत्या भागात पसरला आहे, हे लक्षात येते. परिणामी, तेवढ्याच भागातील कर्करोगाच्या पेशी नष्ट केल्या जातात.      परिणामी, अवयवाची हानी होत नाही आणि अवयव वाचविला जातो. केईएम रुग्णालयात येणाऱ्या अनेक रुग्णांचा कर्करोग धोकादायक टप्प्यात असल्याने अवयवाचा बाधित भाग किंवा बाधित अवयव काढावा लागतो. मात्र, नव्या तंत्रज्ञानाने हे टाळणे सहज शक्य होणार आहे. संबंधित उपकरणाची किंमत साधारण ९५ लाख रुपये आहे. पालिकेकडून या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास रुग्णांसाठी हे तंत्रज्ञान वरदान ठरणार आहे.-डॉ. शिल्पा राव, कर्करोग विभागप्रमुख, केईएम रुग्णालय

टॅग्स :केईएम रुग्णालयकर्करोग