Join us

आता नवबौद्धांनाही अल्पसंख्याक दर्जा, सुविधाही मिळणार, सरकारचे परिपत्रक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 02:54 IST

महाराष्ट्रातील नवबौद्ध हे कायदेशीररीत्या बौद्धच असल्याने ते अल्पसंख्याक समुदायासाठी राबविण्यात येत असलेल्या सरकारी योजनांचा लाभ घेण्यास पात्र आहेत, असे परिपत्रक अल्पसंख्याक विभागाने गुरुवारी काढले.

मुंबई : महाराष्ट्रातील नवबौद्ध हे कायदेशीररीत्या बौद्धच असल्याने ते अल्पसंख्याक समुदायासाठी राबविण्यात येत असलेल्या सरकारी योजनांचा लाभ घेण्यास पात्र आहेत, असे परिपत्रक अल्पसंख्याक विभागाने गुरुवारी काढले.मुस्लीम, ख्रिश्चन, बौद्ध, शीख, पारसी व जैन या धार्मिक समुदायांना अल्पसंख्याक समुदाय म्हणून याआधीच मान्यता देण्यात आली आहे. त्यांना अल्पसंख्याक म्हणून सरकारी सुविधाही दिल्या जातात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे १४ आॅक्टोबर १९५६ रोजी बौद्ध धर्म स्वीकारला होता. त्या वेळी त्यांच्या लाखो अनुयायांनीही बौद्ध धर्माचा स्वीकार केला.बौद्ध धर्म स्वीकारलेल्या अनुयायांना (नवबौद्ध) अनुसूचित जातींसाठीचे कायदेशीर लाभ राज्य सरकारने दिलेले आहेत. हे नवबौद्ध बांधव धर्माने बौद्धच आहेत. राज्यातील नवबौद्धांना कायदेशीररीत्या बौद्ध समजणे अनिवार्य आहे. त्यांना बौद्ध अल्पसंख्याक म्हणून १९५६ पासून कायदेशीर दर्जा आपोआपच मिळाला आहे. त्यामुळे अल्पसंख्याक समुदायासाठीच्या योजनांचा लाभ घेण्यास ते कायदेशीररीत्या पात्र ठरतात, असे परिपत्रक अल्पसंख्याक विकास विभागाचे प्रधान सचिव श्याम तागडे यांनी काढले.