Join us

आता भटक्या प्राण्यांसाठी दहनभट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 01:32 IST

१७ कोटी खर्च : महालक्ष्मी, मालाड, देवनार

मुंबई : भटके श्वान, मांजर असे मोकाट प्राणी मृत झाल्यानंतर त्यांची योग्य विल्हेवाट लावली न गेल्यास दुर्गंधी पसरते. मृत प्राणी उघड्यावर, गटारात, नदी-नाल्यांत थेट टाकले जातात. ही गैरसोय टाळण्यासाठी महापालिकेमार्फत महालक्ष्मी, मालाड आणि देवनारमध्ये प्राण्यांकरिता दहनभट्टी सुरू करण्यात येणार आहे. ही दहनभट्टी ‘पीएनजी’वर आधारित असून भटके श्वान, मांजरांवर येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.महालक्ष्मी, मालाड आणि देवनार या ठिकाणी प्राण्यांसाठी दहनभट्ट्या सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापैकी महालक्ष्मी श्वान नियंत्रण कक्ष कार्यालयाच्या जागेमध्ये टाटा ट्रस्टमार्फत प्राण्यांचे रुग्णालय बांधण्यात येणार आहे. या ट्रस्टमार्फत तेथे प्राण्यांसाठी दहनभट्टीही उभारली जाणार आहे. महापालिकेच्या मालाड येथील गुरांचा कोंडवाडा येथे ताशी ५० किलो व देवनार येथे ताशी ५०० किलो एवढ्या क्षमतेच्या दहनभट्ट्या बसविण्यात येणार आहेत.या दहनभट्ट्यांचे पुढील पाच वर्षांपर्यंत देखभाल व दुरुस्तीचे कंत्राट दिले जाणार आहे. यासाठी मे. अनिथा टेक्सकॉट (इंडिया) कंपनीची निवड करण्यात आली आहे. या दहनभट्ट्या पर्यावरणपूरक असणार आहेत. या प्रस्तावाला स्थायी समितीची मंजुरी मिळाली आहे. पालिकेच्या महासभेने हिरवा कंदील दाखविल्यानंतर दहनभट्ट्या उभारण्याच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे. या दहनभट्टीचे परिचलन पालिकेमार्फत करण्यात येणार आहे.उच्च न्यायालयाने प्राण्यांच्या मृत शरीराचे दहन करण्याचे आदेश दिले आहेत. प्राणी क्लेश प्रतिबंध कायदा १९६० आणि प्राणी जनन नियंत्रण नियमावली २००१ अन्वये प्राण्यांसाठी दहनभट्टीची व्यवस्था स्थानिक प्रशासनाने करणे बंधनकारक करण्यात आले आहे.सध्या महापालिका क्षेत्रात परळ परिसरात पाळीव प्राण्यांसाठी एक खाजगी अंत्यसंस्कार केंद्र आहे. ते एका स्वयंसेवी संस्थेद्वारे चालविले जाते.महापालिका क्षेत्रातील भटक्या जनावरांच्या मृतदेहाची विल्हेवाट बोरीवली परिसरातल्या ‘कोरा केंद्र’ या स्वयंसेवी संस्थेद्वारे लावली जाते.पालिका नवीन दहनभट्टीसाठी १७ कोटी ८० लाख २९ हजार रुपये खर्च करणार आहे.