Join us
Daily Top 2Weekly Top 5

आता आषाढातही शुभमंगल सावधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:06 IST

खर्च कमी आणि मुहूर्त असल्याने विवाह सोहळ्यांचे आयोजनलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : शक्यतो चातुर्मासात विवाह मुहूर्त दिले जात ...

खर्च कमी आणि मुहूर्त असल्याने विवाह सोहळ्यांचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : शक्यतो चातुर्मासात विवाह मुहूर्त दिले जात नव्हते. मात्र, आता महाराष्ट्रातील पंचांगकर्त्यांकडून गेल्या दोन वर्षांपासून चातुर्मासातदेखील विवाह मुहूर्त दिले जात आहेत. त्यामुळे आता चातुर्मासात विवाह सोहळे आयोजित केले जात आहेत.

पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितले की, आषाढी एकादशीपासून कार्तिकी एकादशीपर्यंतच्या काळास चातुर्मास म्हणतात. प्राचीन ग्रंथांमध्ये चातुर्मासात विवाह करू नयेत, असे म्हटले आहे. मात्र, काही ग्रंथांमध्ये चातुर्मासातसुद्धा विवाह करण्यास हरकत नाही, असेही म्हटलेले आहे. त्यानुसार गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्रातील बहुतेक पंचांगकर्त्यांनी चातुर्मासात मुहूर्त दिले आहेत. आता कोरोनामुळे विवाह शक्य होत नाहीत किंवा परदेशातून काही लोक आलेले असतात, त्यांना लगेच परत जायचे असते. अशांसाठी २० जुलै रोजी आषाढी एकादशी झाल्यानंतर २२ जुलैपासून चातुर्मासातील विवाह मुहूर्त आहेत. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यांतील मुहूर्तावर विवाह करण्यास हरकत नाही.

चातुर्मासातील विवाहाचे मुहूर्त

जुलै - २२, २५, २८, २९

ऑगस्ट - २, ४, ११, १२, १४, १८, २०, २१, २५, २६, २७, ३०, ३१

सप्टेंबर - १, ८, १६, १७

ऑक्टोबर - ८, ११, १३, १४, १५, १८, १९, २०, २१, २४, ३०

नोव्हेंबर - ८, ९, १०, १२, १६

५० जणांना परवानगी

पावसाळ्यात जाणे-येणे कठीण असते. शिवाय, शेतीची कामे असतात. त्यामुळे कदाचित मुहूर्त दिले जात नव्हते. आता वाहतुकीची साधने आहेत. त्यामुळे आता लग्न सोहळे करता यावेत म्हणून धार्मिक ग्रंथाच्या आधारे चातुर्मासात विवाह मुहूर्त दिले जात आहेत. सध्या विवाह सोहळ्यास ५० जणांना परवानगी आहे. त्यामुळे पाहुण्यांना विभागून बोलाविले जाते. दिवसभर हॉल घेतला जातो.

वाईटात चांगले

सध्या हॉलदेखील सहज उपलब्ध होत आहेत. कोरोनामुळे खर्च कमी असल्याने लोक विवाह सोहळे करत आहेत. काहीजण ऑनलाइन विवाह करत आहेत. काही फॉर्म हाऊसमध्ये विवाह सोहळे होत आहेत. त्यानिमित्ताने एक ट्रिप होते. मात्र हॉलवाले, मंडप, कंत्राटदार आणि पुरोहित यांच्या व्यवसायावर कोरोनामुळे परिणाम झाला आहे.