मुंबई : आगामी निवडणुकीपूर्वी रेंगाळलेल्या विकासकामांचे बार उडवण्यास महापालिकेने सुरुवात केली आहे. त्यानुसार रस्त्यांची कामे गेल्या महिन्यातच सुरू करण्यात आली. तर आता नाला रुंदीकरण व दुरुस्तीची तब्बल १४९ कोटी रुपयांची कामे येत्या काही दिवसांमध्ये हाती घेण्यात येणार आहेत. रस्ते आणि नालेसफाई घोटाळ्याने गेल्या दोन वर्षांत शिवसेनेची प्रतिमा मलिन केली. त्यामुळे निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी नवीन कामाने जुन्या घोटाळ्यांवर पांघरूण घालण्याची शिवसेनेची धडपड सुरू असल्याचे दिसून येत आहे.रस्त्यावर पडणारे खड्डे आणि पावसाळ्यात तुंबणारे पाणी हे नागरिकांसाठी डोकेदुखीचे कारण ठरत आहेत. मात्र रस्त्यांच्या कामांमध्ये ३५२ कोटी आणि नालेसफाईच्या कामात दीडशे कोटी रुपयांचा घोटाळा गेल्या दोन वर्षांत उजेडात आला. याचे पुरेपूर भांडवल विरोधी पक्ष करीत असून मित्रपक्ष भाजपानेही उलट्या बोंबा सुरू केल्या आहेत. यामुळे अडचणीत आलेल्या शिवसेनेचे धाबे दणाणले आहे. त्यामुळे जुन्या घोटाळ्यांना झाकण्यासाठी नवीन काम झटपट सुरू करण्यात येत आहेत. पावसाळ्यानंतर १००४ रस्त्यांची कामे हाती घेण्यात येणार असल्याचे पालिकेने आधीच जाहीर केले होते. त्याप्रमाणे १९२ रस्त्यांची कामे सुरू करण्यात आली आहेत. उर्वरित कामांचे कार्यादेश निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी प्राधान्याने काढण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे नाले रुंदीकरणाची १४९ कोटी रुपयांची कामे सुरू करण्यात येणार आहेत. यापैकी घाटकोपरसाठी १०७ कोटी रुपये तर मुलुंड, भांडुप, बोरीवली वॉर्डमधील नाल्यांवर ४२ कोटी ९५ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत, याचे प्रस्ताव स्थायी समितीसमोर सादर करण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)मुंबई चकाचक करण्यासाठी तीन वर्षांत हजारो कोटी खर्च करण्यात आले. मात्र ३४ रस्त्यांच्या कामांमध्ये ३८ ते १०० कोटींपर्यंत घोटाळा असल्याचे उजेडात आले. ठेकेदारांपासून प्रशासकीय अधिकाऱ्यांपर्यंत धागेदोरे पोहोचणाऱ्या या ३५२ कोटींच्या घोटाळ्याने महापालिका हादरली होती. मात्र अजूनही या प्रकरणाचा अहवाल गुलदस्त्यात आहे. सहा ठेकेदार, रस्ते व दक्षता विभागाचे अधिकारी, थर्ड पार्टी आॅडिट कंपनीचे अधिकारी या सर्वांचे निलंबन, फौजदारी कारवाई या प्रकरणी सुरू आहे. मात्र त्यानंतर करण्यात आलेल्या दोनशे रस्त्यांच्या पाहणीचा अहवाल अद्याप समोर आलेला नाही. हा घोटाळा उघड करण्याचे श्रेय घेऊन भाजपाने सुटका करून घेतली. त्यामुळे अडचणीत आलेल्या शिवसेनेने दुसरा अहवाल निवडणुकीपूर्वी उघडणार नाही, याची काळजी घेतल्याचे समजते. घोटाळ्याची चौकशी अर्धवट : दीडशे कोटी रुपयांच्या नालेसफाई घोटाळ्यातील दोषी ठेकेदारांनी पालिकेच्या कारवाईलाच आव्हान दिले होते. त्यामुळे ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याची कारवाई मागे घेण्याची नामुष्की महापालिकेवर ओढावली होती. रस्ते घोटाळा उघड झाल्यानंतर मात्र हा घोटाळा मागे पडला.
घोटाळ्यांवर आता विकासाचे पांघरूण
By admin | Updated: November 9, 2016 04:27 IST