नंदकुमार टेणी - ठाणो
महाराष्ट्र विधान परिषदेचे चार आमदार विधानसभेवर निवडून गेल्यामुळे त्यांच्या रिक्त झालेल्या विधान परिषदेवरील आमदारकीची उमेदवारी आपल्याला मिळावी यासाठी शिवसेना, भाजपा आणि काँग्रेस, राष्ट्रवादी अशा सगळ्य़ाच पक्षात घमासान सुरू झाले आहे.
रिक्त झालेल्या चार जागांपैकी दोन जागा भाजपाला, एक जागा शिवसेनेला आणि एक जागा काँग्रेस अथवा राष्ट्रवादीला त्यांच्या त्यांच्या संख्याबळानुसार मिळू शकणार आहे. शिवसेनेचे कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे उपनेते अनंत तरे यांचे बंड शमविण्यासाठी त्यांना विधान परिषदेची उमेदवारी देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार आता त्यांना ही उमेदवारी देऊन मातोश्री व उद्धवजी आपला शब्द राखते की नाही? या कडे संपूर्ण शिवसेनेचे लक्ष लागले आहे. तर मातोश्री
आपला शब्द फिरवून गोरेगावात पडलेल्या सुभाष देसाई यांची विधानपरिषदेवर वर्णी लावण्याच्या प्रयत्नात आहेत. आता हा मुद्या तरेंना उमेदवारी मिळते की नाही असा राहिला नसून तरेंच्या रूपाने कट्टर शिवसैनिकाचा मान राखण्याबाबतचा दिलेला शब्द मातोश्री राखते की नाही? असा झालेला आहे, अशी प्रतिक्रिया जुन्या जाणत्या शिवसैनिकांत व्यक्त होते आहे.
विधानसभा निवडणुकीत पडलेल्या कोणत्याही नेत्याची अथवा कार्यकत्र्याची निवड या पदासाठी केली जाऊ नये अशी शिवसैनिकांची इच्छा असून तिला मातोश्री आणि उद्धव मान देतील असेच संकेत मिळत आहेत. राष्ट्रवादीमध्ये पडलेले अनेक मोहरे एका जागेसाठी साठमारी खेळत आहेत. तर भाजपामध्येदेखील
दोन जागांसाठी घमासान सुरू आहे. भाजपाच्या हाती सत्ता असल्यामुळे आमदार होणो म्हणजे लाल दिवा मिळण्याचा मार्ग खुला होणो असा असल्याने विधान परिषदेची
उमेदवारी पदरात पाडून घेण्यासाठी अनेकांनी नागपूर आणि दिल्ली
या दोन्ही ठिकाणी फिल्डिंग लावलेली आहे. असा प्रकार काँग्रेसमध्येही आहे.
यांनी दिले राजीनामे
विधान सभेवर निवड झाल्याने पृथ्वीराज चव्हाण (काँग्रेस), अशिष शेलार, विनोद तावडे (भाजपा) यांनी विधान परिषद सदस्यत्वाचे राजीनामे दिले आहेत तर विनायक मेटे यांचे विधान परिषद सदस्यत्व रद्द झाले आहे. त्यामुळे या चार जागा रिक्त झालेल्या आहेत. विधानसभा निवडणुकीच्या आधी विधान परिषदेची एक जागा रिक्त झाली होती. त्या जागी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे विजयी झाले आहेत.