Join us  

आता मुख्य रस्त्यांसह मुंबईतील गल्लीबोळही होणार दुर्गंधीमुक्त, स्वच्छतेसाठी लिटर पिकर मशिन्सचा वापर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2024 10:20 AM

अडगळीच्या परिसरात स्वच्छतेसाठी लिटर पिकर मशिन्स.

मुंबई :मुंबईतील मुख्य रस्त्यांसोबतच गल्लीबोळातील तसेच अंतर्गत रस्ते स्वच्छ करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर ज्या ठिकाणी स्वच्छता करण्यासाठी अतिशय आव्हानात्मक परिस्थिती आहे, अशा ठिकाणी यांत्रिक पद्धतीने स्वच्छता करण्यासाठी पालिकेने पुढाकार घेतला आहे. मुंबईत ठिकठिकाणी मनुष्यबळ वापरून जी ठिकाणे स्वच्छ करता येत नाहीत, अशा ठिकाणी कचरा संकलन करणाऱ्या व्हेईकल माऊंटेड लिटर पिकर मशिन्स वापर करण्यात येणार आहे. 

मुंबईत मुख्य रस्त्यांसोबतच गल्लीबोळातही स्वच्छता मोहीम राबविताना नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर करून परिसर स्वच्छतेला प्राधान्य देण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून मेकॅनिकल पॉवर स्विपिंग, भूमिगत कचरापेट्या, बंदिस्त कॉम्पॅक्टर वाहने आदी नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून मुंबईत स्वच्छतेची प्रक्रिया जलद करण्याचा घनकचरा विभागाचा मानस आहे. या प्रकल्पात व्हेईकल माऊंटेड लिटर पिकर मशिन्स उपयुक्त ठरल्याने आणखी २१ वाहने समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

‘व्हॅक्यूम सक्शन’द्वारे उचलणार कचरा  -

१) अतिशय अडगळीच्या जागी स्वच्छतेसाठी येणाऱ्या मर्यादा पाहता या व्हेईकल माऊंटेड लिटर पीकर मशिन्सचा वापर करण्यात येणार आहे.

२) याचा वापर विविध प्रकारचा कचरा गोळा करण्यासाठी होतो. प्रामुख्याने प्लास्टिक, कागद, धूळ, वाळू, काचेचे तुकडे, बॉटल्स, कॅन, नारळ, तरंगता कचरा आदी गोळा करण्यासाठी या मशिन्स अतिशय उपयुक्त आहेत. ‘व्हॅक्यूम सक्शन’ पद्धतीने या मशिन्स कचरा ओढून घेण्याचे काम करतात.

एम पूर्व, एन, जी उत्तर, डी, आर दक्षिण, के पश्चिम, एच पूर्व या विभागात सध्या सात संयंत्रे कार्यरत आहेत. या सातही विभागांमध्ये या संयंत्रांची कामगिरी समाधानकारक असल्यामुळे इतर विभागीय कार्यालयांसाठी प्रत्येकी एक यानुसार संयंत्रे घेण्यात येतील.- संजोग कबरे, उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन विभाग

मशीनची वैशिष्ट्ये - ओला आणि सुका अशा दोन्ही प्रकारचा कचरा उचलण्याची मशीनची क्षमता आहे. १४२० लिटर इतकी कचरा साठवण्याची या मशीनची क्षमता आहे. कचरा ओढण्यासाठीच्या पाइपची लांबी ९.३ फूट इतकी आहे. तसेच २४० डिग्री इतके फिरू शकते.

टॅग्स :मुंबईनगर पालिका