मुंबई : पश्चिम रेल्वेवरील एका लोकलमधील महिला डब्यातील सीसीटीव्हीची यशस्वीरीत्या चाचणी घेण्यात आल्यानंतर आणखी तीन लोकलमधील नऊ महिला डब्यांत सीसीटीव्ही बसविण्याचे काम पश्चिम रेल्वेकडून पूर्ण करण्यात आले. एकूण १७ लोकलमधील ५0 महिला डब्यात सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहे. मध्यरेल्वेच्या एका लोकलमधील महिला डब्यात काही महिन्यांपूर्वीच सीसीटीव्ही बसविण्यात आल्यानंतर सीसीटीव्ही असणारी पहिली लोकल ३ आॅक्टोबर २0१५ पासून सेवेत आली आणि ही चाचणी यशस्वी झाली. त्यानंतर मध्य रेल्वेच्या दहा लोकलमधील एकूण ५0 महिला डब्यात सीसीटीव्ही बसविण्यात येणार असून प्रत्येक डब्यात तीन ते चार सीसीटीव्ही बसविले जातील, अशी माहिती मध्य रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून देण्यात आली. जवळपास असे १५0 पेक्षा जास्त सीसीटीव्ही डिसेंबरपर्यंत बसविले जाणार आहेत. (वार्ताहर)
आता ५0 महिला डब्यांत १५0 सीसीटीव्ही कॅमेरे
By admin | Updated: June 20, 2016 01:58 IST