Join us
Daily Top 2Weekly Top 5

कादंबरीकार प्रवीण बांदेकर यांना ‘गंगाधर गाडगीळ साहित्य पुरस्कार’ जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 05:54 IST

कवी, कादंबरीकार प्रवीण दशरथ बांदेकर यांना गंगाधार गाडगीळ साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

मुंबई : कवी, कादंबरीकार प्रवीण दशरथ बांदेकर यांना गंगाधार गाडगीळ साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. रौप्य महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने यंदाचा पुरस्कार प्रदान सोहळा १७ नोव्हेंबर, २०१९ रोजी सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आला आहे.मराठी साहित्यातील प्रायोगिक आणि नावीन्यपूर्ण लेखन करणाऱ्या लेखकांचा गौरव करण्याच्या हेतूने मराठी नवकथेचे जनक गंगाधर गाडगीळ यांनी १९९३ साली ‘वासंती गंगाधर गाडगीळ विश्वस्त निधी’ची स्थापना केली. या निधीतर्फे दर तीन वर्षांनी गंगाधर गाडगीळ साहित्य पुरस्कार दिला जातो. या पुरस्काराचे हे २५वे वर्ष असून, २०१८ या वर्षाचा नववा पुरस्कार कादंबरीकार प्रवीण बांदेकर यांना जाहीर झाला आहे.मराठी साहित्यक्षेत्रातील आजच्या पिढीचे कवी, कादंबरीकार म्हणून प्रवीण बांदेकर हे नाव सर्वांच्या परिचयाचे आहे. बांदेकर यांच्या लेखनाला सुरुवात झाली ती काव्यलेखनाने. ‘सिंधुदुर्ग साहित्य संघ’ या साहित्यिक व्यासपीठावर त्यांनी आपल्या पहिल्या कवितेचे वाचन केले. अनेक वर्षे त्यांनी ‘नवाक्षर दर्शन’ या वाङ्मयीन मराठी नियतकालिकाचे संपादक म्हणूनकाम पाहिले आहे, तसेच वाङ्मयविषयक चर्चासत्रांमधून त्यांनी अनेक अभ्यासपूर्ण शोधनिबंधही सादर केले आहेत. प्रवीण बांदेकर यांच्या कविता व कादंबऱ्यांमधून आजचा काळ आणि या काळाने उभे केलेले सामाजिक, राजकीय व धार्मिक प्रश्न यांची चिकित्सा केलेली दिसते.१९९४ पासून गंगाधर गाडगीळ साहित्य पुरस्काराची सुरुवात झाली असून, यापूर्वी हा पुरस्कारश्याम मनोहर, रत्नाकर मतकरी, विलास सारंग, वसंत आबाजी डहाके, नामदेव ढसाळ, मकरंद साठे, राजीव नाईक, जयंत पवार यांना प्रदान करण्यात आला आहे.