Join us

अग्निशमन यंत्र नसलेल्या इमारतींना नोटिसा

By admin | Updated: May 27, 2014 00:50 IST

पनवेल परिसरात इमारतींना आगी लागण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे.

पनवेल : पनवेल परिसरात इमारतींना आगी लागण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. अशा घटना वारंवार घडू नयेत म्हणून नवीन तसेच जुन्या इमारतींमध्ये अग्निशमन यंत्र असणे आवश्यक आहे. पनवेल अग्निशमन विभागाने ज्या इमारतीत अग्निशमन यंत्र नाही अशा इमारतींना नोटिसा बजावल्या आहेत. पनवेल शहरात अनेक बहुमजली इमारती उभ्या आहेत. या इमारतींना आग लागल्यास ती आटोक्यात आणणे अवघड असून मोठी हानी होवू शकते. यासाठी कोणत्याही प्रकारे आगीसारखी घटना घडू नये म्हणून अगोदरच काळजी घेणे गरजेचे आहे. पनेवल शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात इमारती उभ्या राहत आहेत. त्यामुळे प्रत्येक इमारतींमध्ये अग्निशमन यंत्र असणे गरजेचे आहे. अग्निशमन दलाने केलेल्या पाहणीदरम्यान बहुतांशी इमारतीत अशी यंत्रणा नसल्याचे आढळून आले. यामुळे परिसरातील इमारतींना विभागाकडून नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. गेल्या तीन वर्षांपासून प्रत्येक नव्या जुन्या इमारतींमध्ये अग्निशमन यंत्रणा असणे सक्तीचे केले आहे. नवीन इमारत बांधावयाची असेल तर बांधकाम व्यावसायिकाला अग्निशमन विभागाची परवानगी घ्यावी लागते. परिसरात इमारतींना आगी लागण्याचे प्रमाण वाढत आहेत ते टाळण्यासाठी इमारतींमध्ये अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित करणे आवश्यक आहे. ज्या इमारतीत अग्निशमन यंत्रणा नाही अशा इमारतींना नोटिसा पाठविण्यात आल्याचे पनवेल अग्निशमन विभागाचे जी.बी. भगत यांनी सांगितले.(वार्ताहर)