कमलाकर कांबळे, नवी मुंबई कॉलेज सुरू करण्यासाठी दिलेल्या भूखंडावर कॉलेज न उभारता गेल्या पाच वर्षांपासून आयसीएसई बोर्डाची शाळा सुरू करून करारातील नियम व अटींचे उल्लंघन केल्याप्रकरणी सिडकोने मांजरा चॅरिटेबल ट्रस्टला कारणे दाखवा नोटीस बाजावली आहे. विशेष म्हणजे दोन वेळा नोटीस बजावूनही सदर संस्थेकडून त्याला कोणतेही समाधानकारक उत्तर न मिळाल्याने याप्रकरणी कायदेशीर कारवाई करण्याच्या दृष्टीने सिडकोने चाचपणी सुरू केली आहे.सिडकोने मांजरा चॅरिटेबल ट्रस्टला ज्युनियर आणि डिग्री कॉलेज सुरू करण्यासाठी वाशी सेक्टर २९ येथे ५५८९ चौ.मीटर क्षेत्रफळाचा भूखंड दिला आहे. शहरातील इतर शैक्षणिक संस्थांप्रमाणे हा भूखंडही सवलतीच्या दरात देण्यात आला आहे. मात्र करारातील अटी व नियमांचा भंग करीत संस्थेने या भूखंडावर कॉलेज सुरू करण्याऐवजी कंपोझिट स्कूलच्या नावाखाली पाच वर्षांपासून आयसीएसई बोर्डाची गोल्ड क्रेस्ट हाय नामक शाळा सुरु केल्याची बाब उघडकीस आली आहे. याची गंभीर दखल घेत सिडकोने करारनाम्यातील अटी-शर्तींचा भंग केल्याप्रकरणी या संस्थेला २३ मे २०१४ रोजी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या नोटिशीला उत्तर देताना संस्थेने केलेल्या खुलाशात सिडकोच्या अटी-शर्तींना बगल देत ज्युनियर कॉलेज सुरु केल्याचा दावा केला आहे. दरम्यान, संस्थेने करारनाम्यातील अटी व शर्तींचा भंग केल्याप्रकरणी सिडकोने गंभीर दखल घेतली आहे. तसेच याप्रकरणी संस्थेने सादर केलेला खुलासा समाधानकारक नसल्याने यासंबंधी विधी विभागाकडून अभिप्राय मागविण्यात आला आहे. हा अभिप्राय प्राप्त होताच मांजरा चॅरिटेबल ट्रस्टवर पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे सिडकोच्या सूत्रांनी सांगितले. राज्यमंत्री अमित देशमुख हे या संस्थेचे चेअरमन आहेत. यासंदर्भात त्यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही. सिडकोच्या भूमिकेमुळे शहरातील इतर खासगी शिक्षण संस्था चालकांचे धाबे दणाणले आहेत. (प्रतिनिधी)०
मांजरा चॅरिटेबल ट्रस्टला नोटीस
By admin | Updated: July 21, 2014 01:19 IST