Join us  

मुंबई विद्यापीठाला मानवी हक्क आयोगाकडून नोटीस!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2019 1:50 AM

लोकमतच्या बातमीची दखल : परीक्षेला हजर असूनही विद्यार्थिनीला दिले होते शून्य गुण

मुंबई : विधि शाखेच्या पाचव्या सत्र परीक्षेत शून्य गुण मिळालेल्या विद्यार्थिनीला गैरहजर दाखविल्याचा प्रकार समोर आल्यानंतर मानवी हक्क आयोगाकडून मुंबई विद्यापीठाला नोटीस पाठविण्यात आली आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

विधि शाखेची विद्यार्थिनी असलेल्या काजल पाटील हिने परीक्षा देऊनही तिला परीक्षेत गैरहजर दाखवत शून्य गुण देण्यात आले होते. याबाबत विद्यापीठाकडे वारंवार पाठपुरावा करूनही उपयोग झाला नाही. विद्यापीठाकडून घडलेल्या या प्रकाराची बातमी ‘लोकमत’ने १२ एप्रिल रोजी प्रसिद्ध केली होती.

या बातमीची दखल घेत मानवी हक्क आयोगाने मुंबई विद्यापीठावर सुमोटो दाखल करून नोटीस जारी केली. तसेच कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांना सुनावणीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. मात्र, ती सुनावणी होऊ न शकल्याने आता २८ जून रोजी सुनावणीठेवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, पहिल्या सुनावणीवेळी काजल हिला विद्यापीठाकडून कळविण्यात आले नाही. त्यामुळे विद्यापीठाने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप काजलचे वकील सचिन पवार यांनी केला आहे.

अहवाल सादर करणार२८ जूनला या प्रकरणाचा अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. तांत्रिक कारणास्तव या विद्यार्थिनीचा निकाल बाकी होता. तो जाहीर केला असून, तिची गुणपत्रिकाही पुढे पाठविण्यात आल्याचे परीक्षा विभागाचे उपकुलसचिव विनोद मळाळे यांनी दिली.

टॅग्स :मुंबई विद्यापीठ