चेतन ननावरे, मुंबईवैध मापन शास्त्र विभागाच्या प्रमाणपत्राशिवाय शुक्रवारी भूखंड आणि सदनिकांच्या खरेदी खताची नोंदणी करणाऱ्या मुंबईतील चार बिल्डरांना प्रशासनाने नोटिसा धाडल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे याप्रकरणी संबंधित प्रशासनाने मुंबई महानगरपालिकेसह मुंबई उपनगरच्या सह जिल्हा निबंधकांनाही नोटिसा धाडल्याची माहिती ‘लोकमत’ला मिळाली आहे.दरम्यान, संबंधित विभागाच्या प्रमाणपत्राशिवाय शासनाच्या जिल्हा सह निबंधकांनी कोणत्याही भूखंड किंवा सदनिकेच्या खरेदी खतांची नोंदणी करू नये, असे फर्मान नुकतेच काढले होते. मात्र त्याकडे कानाडोळा करत खरेदी खतांची नोंदणी करणाऱ्या बिल्डर आणि प्रशासकीय विभागांवर वैध मापन शास्त्र विभागाचे नियंत्रक संजय पाण्डेय यांनी बडगा उचलत धडाकेबाज कारवाईला सुरुवात केली आहे. याआधी खरेदी खतांची नोंदणी करताना अशा कोणत्याही प्रमाणपत्राची गरज नसल्याचा दावा सह जिल्हा निबंधक कार्यालयाकडून करण्यात येत होता. मात्र ज्या ठिकाणी मोजमापाचा संबंध येतो, त्या मोजमापाचे प्रमाणिकरण करण्याचा नियम कायद्यात आहे. त्यामुळे पूर्वीच्या नियंत्रकांनी कानाडोळा केलेल्या नियमाची अंमलबजावणी करत असल्याचे पाण्डेय यांनी सांगितले. मुळात खरेदी खताची नोंदणी करताना एकर किंवा फुटांमध्ये नोंदणी करणे बेकायदेशीर आहे. देशात कोणत्याही वजनमापाचे प्रमाणीकरण हे एमकेएस पद्धतीने करणे गरजेचे आहे. त्यामुळे यापुढे एकर आणि फुटांमध्ये नोंदणी करता येणार नाही. मीटर आणि हेक्टरमध्ये नोंदणी करताना मोजणी करण्याचे माप हे वैधमापनशास्त्र विभागाकडून प्रमाणित करून घेणे बंधनकारक राहील.
मापात पाप केलेल्या चार बिल्डरांना नोटिसा
By admin | Updated: December 23, 2014 01:32 IST