लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्य मंडळाच्या निर्देशानुसार शिक्षक शाळेत दहावीचे गुणांकांचे काम ११ जूनपासून करीत आहेत. या कालावधीत बी.एल.ओ.च्या कामासाठी शिक्षक निवडणूक कार्यालयात उपस्थित न राहिल्याने मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयाकडून शिक्षकांना नोटिसा पाठविल्या जात आहेत. दहावी निकालाचे काम अजूनही सुरू आहे. तोच निवडणूक कार्यालयाकडून अशा नोटिसा मिळाल्याने शिक्षकांमध्ये नाराजी असून ते याचा तीव्र निषेध व्यक्त करीत आहेत.
दहावीचे गुणांकांचे कार्य पूर्ण झाले असले तरी त्रुटीपूर्ततेचे काम अजून काही दिवस चालू राहणार आहे. अशा प्रकारे नोटिसा मिळाल्याने शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी मतदार यादी बनवण्यासाठी शिक्षकांना जुंपले जात आहे. महापालिकेकडे एक लाख कर्मचारी असताना खासगी शाळेतील शिक्षकच का? असा सवाल आता शिक्षकांनी केला आहे. निवडणूक आयोगाला आणि जिल्हाधिकारी यांना शिक्षकांना कामे देऊ नयेत म्हणून १८ जून २०२१ रोजी राज्य शिक्षक परिषदेने पत्र दिले आहे, तरीही निवडणूक मतदार यादी कामाची जबरदस्ती सुरू आहे.
ऑनलाईन शिक्षण बंद करून आता शिक्षकांनी बीएलओचे काम करायचे का? असा सवाल राज्य शिक्षक परिषदेचे मुंबई कार्यवाह शिवना दराडे यांनी उपस्थित केला आहे. या संदर्भात आता शिक्षणमंत्र्यांनी दखल घ्यावी आणि शिक्षकांचे निवडणूक काम थांबवावे अशी मागणी केली आहे.