Join us  

नोटा, नाण्यांचा आकार, वैशिष्ट्ये सतत बदलणे योग्य नाही : उच्च न्यायालय

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2019 12:42 AM

गुरुवारच्या सुनावणीत आरबीआयने यासंदर्भात माहिती संकलित करण्यासाठी न्यायालयाकडून दोन आठवड्यांची मुदत मागितली. ‘आम्हाला संकलित माहिती नको.

मुंबई : चलनातील नोटा, नाण्यांचा आकार व वैशिष्ट्ये सतत बदलत राहणे योग्य नाही. दृष्टिहीन माणसांना नोटा व नाण्यांचा आकार, वैशिष्ट्यांचा अभ्यास करण्यासाठी वर्षे घालवावी लागतात, असे न्यायालयाने म्हटले.नोटा, नाण्यांच्या आकारात व वैशिष्ट्यांत वारंवार बदल का करण्यात येतात, याची कारणे आम्हाला दोन आठवड्यांत द्या, असे निर्देश मुख्य न्या. प्रदीप नंद्राजोग व न्या. भारती डांगरे यांच्या खंडपीठाने आरबीआयला दिले.दृष्टिहीनांसाठी नव्या नोटा व नाणी ओळखणे कठीण झाले आहे. दृष्टिहीनांना नोटा व नाणी ओळखता यावीत, यासाठी आरबीआयला विशेष मोबाइल अ‍ॅप विकसित करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी नॅशनल असोसिएशन आॅफ ब्लार्इंडने जनहित याचिकेद्वारे केली आहे. या याचिकेवरील सुनावणीत उच्च न्यायालयाने वरील निर्देश आरबीआयला दिले.गुरुवारच्या सुनावणीत आरबीआयने यासंदर्भात माहिती संकलित करण्यासाठी न्यायालयाकडून दोन आठवड्यांची मुदत मागितली. ‘आम्हाला संकलित माहिती नको. नोटा व नाण्यांचे रंग, आकार व वैशिष्ट्ये बदलण्याचे कारण हवे आहे,’ असे न्यायालयाने आरबीआयला स्पष्ट केले.आरबीआयला अधिकार आहेत म्हणून ते अधिकारांचा मनमानी वापर करू शकत नाहीत. ‘दृष्टिहीन नागरिक नोटा व नाण्यांचे आकार, वैशिष्ट्ये ओळखण्यास अनेक वर्षे घालवतात. आणि ओळखायला सुरुवात केली की आरबीआय पुन्हा नोटा त्यात बदल करते. बनावट चलनामुळे नव्या नोटा चलनात आणण्यात आल्या व त्यांचा आकार, वैशिष्ट्ये बदलली, असा दावा तुम्ही करीत आहात. मात्र, त्यात तथ्य नाही,’ अशा शब्दांत उच्च न्यायालयाने आरबीआयला सुनावले.

टॅग्स :न्यायालय