कर्जत : महिला मंडळाचे कार्य उल्लेखनीय आहे, त्यांच्या प्रयत्नाने ही शाळा उभी राहिली असून काही वर्षांपूर्वीच लावलेल्या या रोपट्याचा वटवृक्ष झाला आहे. नेहमीचा अभ्यास आहेच, मात्र वार्षिक स्नेहसंमेलनाचे दोन ते तीन दिवस म्हणजे विद्यार्थ्यांच्या कलागुणाला व्यासपीठ, असे प्रतिपादन कर्जत नगरपरिषदेचे नगराध्यक्ष राजेश लाड यांनी उद्घाटनप्रसंगी केले.कर्जत महिला मंडळाचे विद्या विकास मंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते. कर्जत नगरपरिषदेचे नगराध्यक्ष राजेश लाड यांच्याहस्ते दीपप्रज्वलन करून समारंभाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी महिला मंडळाच्या अध्यक्षा लीलाताई दिवाडकर, नगरसेविका बिनिता घुमरे, मुख्याध्यापिका मीना प्रभावळकर, शाळेचे आधारस्तंभ गणेश सोनी, सचिव वैदेही पुरोहित यावेळी उपस्थित होते. शाळेच्या विद्यार्थ्यांनी ईशस्तवन व स्वागतगीत सादर केले. त्यांना हार्मोनियमवर दत्ताबुवा कांबळे यांनी, तर तबल्यावर सुनील पालांडे यांनी साथसंगत केली. मुख्याध्यापिका मीना प्रभावळकर यांनी उपस्थितांचे स्वागत करु न प्रास्ताविकात महिलांनी जे रोपटे लावले होते, त्याचे रूपांतर आज वटवृक्षात झाल्याने महिलांना आनंद होत असल्याचे त्यांनी सांगितले. सुरूवातीला प्रमुख पाहुणे असलेले नगराध्यक्ष राजेश लाड यांच्या हस्ते विज्ञान प्रदर्शन, कला प्रदर्शन व रांगोळी प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर बाल शिशू ते इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रमही झाला. सूत्रसंचालन व आभार श्रध्दा मुंढेकर यांनी मानले. याप्रसंगी सिंधुताई फडकर, शोभा मित्रगोत्री, पूजा सुळे, श्रेया वैद्य, वृषाली यादव आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)
महिला मंडळाचे कार्य उल्लेखनीय
By admin | Updated: January 28, 2015 22:59 IST