Join us  

शिवाजी पार्क नव्हे, आता ‘छत्रपती शिवाजी महाराज पार्क’; नामकरणाच्या प्रस्तावाला मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2020 12:39 AM

विविध खेळांबरोबरच राजकीय सभांसाठी प्रथम पसंती असलेले शिवाजी पार्क हे मैदान १९२५ मध्ये पालिकेने जनतेसाठी खुले केले. याचे मूळ नाव माहीम पार्क असे होते.

मुंबई : शिवाजी पार्क या नावाने प्रसिद्ध असलेल्या दादर पश्चिम येथील ऐतिहासिक मैदानाचे नामकरण करण्यात येणार आहे. यापुढे या मैदानाला शिवाजी पार्क बोलण्याऐवजी ‘छत्रपती शिवाजी महाराज पार्क’ असे संबोधले जाणार आहे. याबाबतची मागणी महापालिका महासभेत बुधवारी एकमताने मंजूर करण्यात आली.

आतापर्यंत शिवाजी पार्क या नावाने हे मैदान ओळखले जात होते. मात्र यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान होत असल्याने हा प्रस्ताव पालिका सभागृहात बुधवारी पुन्हा चर्चेसाठी आणून छत्रपती शिवाजी महाराज पार्क असे नामकरण करावे, अशी उपसूचना स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी मांडली. या उपसूचनेला सर्वपक्षीय नगरसेवकांनी पाठिंबा दिला. यामुळे या मैदानाचे नाव छत्रपती शिवाजी महाराज पार्क असे करण्यास महासभेने एकमताने मंजुरी दिली.

शिवाजी पार्कचा इतिहास...विविध खेळांबरोबरच राजकीय सभांसाठी प्रथम पसंती असलेले शिवाजी पार्क हे मैदान १९२५ मध्ये पालिकेने जनतेसाठी खुले केले. याचे मूळ नाव माहीम पार्क असे होते. या मैदानावर समुद्राच्या बाजूस छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा १९६६ मध्ये उभारण्यात आला. या मैदानावर राज्य सरकारचे अनेक शासकीय कार्यक्रम होतात. अशा या मैदानाला शिवाजी पार्क असे नाव देण्याचा प्रस्ताव पालिकेच्या सभागृहात १० मे १९२७ ला मंजूर करण्यात आला. त्यानंतर मैदानाला आतापर्यंत शिवाजी पार्क या नावाने संबोधले जात होते.मैदानाचे महत्त्व

  • शिवाजी पार्क या मैदानावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सलग ४० वर्षे शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात शिवसैनिकांना संबोधित केले आहे.
  • राज्यात सध्या अस्तित्वात असलेल्या महाविकास आघाडीच्या सरकारचा शपथविधीही या मैदानावर झाला होता.
  • याच मैदानात क्रिकेटचा सराव करणारे सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, संदीप पाटील, किरण मोरे आदी खेळाडूंनी क्रिकेट विश्वात भारताचे नाव उंचावले.
  • राजकीय सभा घेण्यासाठी अनेक राजकीय पक्ष आणि नेते प्रयत्नशील असतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी, ६ डिसेंबरला देशभरातून लाखो भीम अनुयायी चैत्यभूमीला अभिवादन करण्यासाठी येत असतात.
  • हा कट्टा तरुण आणि वयस्कर मंडळींसाठी विश्रांतीचा थांबा आहे.
टॅग्स :छत्रपती शिवाजी महाराजशिवसेना