Join us

केवळ आई नको, बाबाही हवेत!

By admin | Updated: June 19, 2016 04:12 IST

देशात घटस्फोटित दाम्पत्याच्या अल्पवयीन मुलाचा ताबा आईकडेच देण्यात येतो. अल्पवयीन मुलाची काळजी, सांभाळ केवळ आईच करू शकते, असा समज जनसामान्यांत आहे आणि या समजामध्ये

- दीप्ती देशमुख, मुंबई

देशात घटस्फोटित दाम्पत्याच्या अल्पवयीन मुलाचा ताबा आईकडेच देण्यात येतो. अल्पवयीन मुलाची काळजी, सांभाळ केवळ आईच करू शकते, असा समज जनसामान्यांत आहे आणि या समजामध्ये भर पडली आहे ती कायद्यातील तरतुदीमुळे. वडील आईप्रमाणे प्रेम करू शकत नाही किंवा मुलाला बाबांपेक्षा आईचीच अधिक गरज आहे, असे समजून वडिलांना मुलाचा ताबा नाकारण्यात येतो. मुलाचा ताबा मिळावा, यासाठी वर्षानुवर्षे न्यायालयाच्या पायऱ्या चढणाऱ्या वडिलांचा संघर्षही लक्षात घेणे आवश्यक आहे. मुलांच्या संगोपनासाठी आईबरोबर बाबांच्या सहवासाची आणि प्रेमाचीही गरज असते. मुलांना बाबांचीही गरज असते. ही बाब उशिराने का होईना लॉ कमिशनच्याही लक्षात आली म्हणूनच लॉ कमिशनने मुलाचा ताबा देण्यासंदर्भातील कायद्यात सुधारणा करून ‘जॉइंट पॅरेंटिंग’ची तरतूद करण्याची आवश्यकता आहे, असे २०१५ मधील अहवालात म्हटले. लॉ कमिशनची ही शिफारस मुलांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. बाहेरच्या देशात मुलांची मानसिकता व मुलांच्या विकासात वडिलांची भूमिकाही आईइतकीच महत्त्वाची आहे, हे जाणून घेत ‘जॉइंट पॅरेंटिंग’ संकल्पना सुरू केली. यामध्ये मुलाचा ताबा दोन्ही पालकांना समान काळासाठी देण्यात येतो. त्यामुळे मूल आई-वडिलांच्या प्रेमाचा अनुभव घेऊ शकते. लॉ कमिशनने ‘जॉइंट पॅरेंटिंग’ची शिफारस केल्यानंतर वांद्रे न्यायालयाने मे २०१५ मध्ये एका दाम्पत्याला मुलीचा ताबा सहा- सहा महिन्यांकरिता वाटून दिला. असा निर्णय घेणारे देशातील हे पहिलेच न्यायालय. त्यामुळे हा निर्णय ऐतिहासिक मानला जातो.व्यवसायाने डॉक्टर असलेल्या वडिलांना सुरुवातीला मुलीचा ताबा नाकारण्यात आला. मात्र लॉ कमिशनच्या शिफारशीनंतर न्यायालयाने मुलीचा ताबा सहा महिन्यांसाठी आईकडे व उर्वरित सहा महिने वडिलांना देण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी पॅरेंटिंग प्लॅनही आखण्यात आला. मात्र उच्च न्यायालयाने हा निर्णय रद्द केला.मुलाचा ताबा आईकडे देण्याची प्रथा या देशात आहे. मात्र यात बदल करण्याची आवश्यकता आहे. मुलाला वडिलांच्या प्रेमाची, स्नेहाची तितकीच आवश्यकता असते. आईबरोबरच वडिलांचे प्रेम मिळवण्याचा मुलांना अधिकार आहे. दोघांनाही मुलांचा ताबा मिळाल्यास मुलाचे संगोपन योग्यरीत्या होईल. त्याचा मानसिक कोंडमारा होणार नाही. मुलाच्या मानसिक आरोग्यासाठी दोन्ही पालकांकडे त्याचा ताबा असणे आवश्यक आहे, असे निरीक्षण वांद्रे न्यायालयाने नोंदवले होते.आईबरोबरच वडिलांनाही मुलांचा ताबा देण्यास हळूहळू सुरुवात झाली आहे. मुलांच्या संगोपनासाठी वडिलांचे त्यांच्या जवळ असणे आवश्यक आहे. केवळ मुलांच्या देखभालीचा खर्च देऊन वडिलांचे कर्तव्य पार पडत नाही, तर मुलांना त्यांच्या सहवासाचीही गरज असते, हे ओळखून वडिलांना मुलांच्या सुटीमध्ये काही दिवसांचा ताबा देण्याची प्रथा सुरू झाली आहे. असे असले तरी जॉइंट पॅरेंटिंगबाबत गांभीर्याने विचार करण्याची आता वेळ आली आहे. कारण मुलांच्या जीवनात आईइतकेच बाबाही महत्त्वाचे आहेत. - आईबरोबरच वडिलांनाही मुलांचा ताबा देण्यास हळूहळू सुरुवात झाली आहे. मुलांच्या संगोपनासाठी वडिलांचे त्यांच्या जवळ असणे आवश्यक आहे. केवळ मुलांच्या देखभालीचा खर्च देऊन वडिलांचे कर्तव्य पार पडत नाही, तर मुलांना त्यांच्या सहवासाचीही गरज असते, हे ओळखून वडिलांना मुलांच्या सुटीमध्ये काही दिवसांचा ताबा देण्याची प्रथा सुरू झाली आहे. असे असले तरी जॉइंट पॅरेंटिंगबाबत गांभीर्याने विचार करण्याची आता वेळ आली आहे. कारण मुलांच्या जीवनात आईइतकेच बाबाही महत्त्वाचे आहेत. तरी जॉइंट पॅरेंटिंगबाबत गांभीर्याने विचार करण्याची आता वेळ आली आहे.