Join us  

सरकारकडून मदतीची अपेक्षा नाही, परंतु खड्ड्यांमुळे कुणाचाही जीव जाऊ नये

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2019 6:38 AM

आई गमावलेल्या यतीनची भावनिक साद; निष्पापांचे जीव वाचतील अशा रस्त्यांची अपेक्षा

ओंकार गावंड।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : आमच्या कुटुंबाला सरकारकडून कोणत्याही मदतीची अपेक्षा नाही, परंतु खड्ड्यांमुळे कुणाचाही जीव जाता कामा नये. केवळ खड्ड्यांमुळे दुचाकीवरून पडून माझ्या आईचा मृत्यू झाला, हे संपूर्ण कुटुंबासाठी वेदनादायी आहे. निष्पाप लोकांचे जीव वाचतील, असे रस्ते सरकारने बांधावेत, जेणेकरून जी वेळ आज आमच्यावर आली, ती वेळ इतर कुणावर येणार नाही, अशा भावना यतीन कदम याने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केल्या.टिळकनगर येथील रहिवासी असलेल्या ६३ वर्षीय शैला कदम कामानिमित्त आपला मुलगा यतीन कदम याच्यासोबत २७ सप्टेंबर रोजी दुपारी ऐरोली येथे दुचाकीवरून जात होत्या. मुलुंड येथील ऐरोली रोडवर दुचाकी खड्ड्यामध्ये आपटून तोल जाऊन शैला कदम खाली पडल्या. या दुर्घटनेत जखमी झालेल्या शैला यांना मुलगा यतीनने तत्काळ नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

यतीनने सांगितले, अपघाताच्या ठिकाणी मी चालवत असलेल्या दुचाकीचा वेग अत्यंत कमी होता. मुलुंड टोल नाका पार केल्यानंतर रस्त्यात अचानक खड्डे आले. त्या खड्ड्यांमधून जाताना मी कसाबसा तोल सावरला. मात्र, माझ्यामागे बसलेल्या आईचा तोल गेला व ती खाली कोसळल्याने तिच्या डोक्याला दुखापत झाली होती.‘खड्डे त्वरित बुजवा’शैला यांचे पती प्रदीप कदम यांनी संगितले की, घडलेली घटना अत्यंत धक्कादायक आहे. केवळ खड्ड्यांमुळे आम्ही कुटुंबातला सदस्य गमावला. सरकारने रस्त्यावरील खड्डे त्वरित बुजवावे, जेणेकरून लोकांचे जीव वाचतील.