नागोठणे : सोळाव्या लोकसभेची रायगड मतदारसंघाची मतमोजणी आज पूर्ण होऊन चुरशीच्या लढतीत महायुतीचे अनंत गीते यांनी काँग्रेस आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांचा पराभव करीत सहाव्यांदा खासदार होण्याचा मान मिळविला. देशभरात पसरलेल्या मोदी लाटेचा प्रभाव रायगडातही दिसून आला असून गीते यांच्या विजयात तरुणाईचा सहभाग मोठा असल्याचे समोर आले आहे. मतमोजणीला सकाळपासून सुरु वात झाल्यानंतर नागोठणे शहरातील सर्वपक्षीय नेतेमंडळी तसेच कार्यकर्ते घरी बसूनच मतांचा कानोसा घेत असल्याने शहरात दुपारपर्यंत शुकशुकाट होता. तीन वाजण्याच्या सुमारास गीते यांच्या विजयाचे वृत्त येताच शिवाजी चौकात जमून शिवसेना व भाजपाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करीत फटाक्यांची आतषबाजी केली व घोषणा दिल्या. यावेळी सरपंच प्रणय डोके, उपसरपंच शैलेंद्र देशपांडे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष किशोर म्हात्रे, ग्रामपंचायत सदस्य डॉ. मिलिंद धात्रक, प्रकाश मोरे, सुरेश जैन यांच्यासह संजय महाडिक, जयेंद्र गुरव, आयुब मुल्ला, इम्रान पानसरे, नारायण म्हात्रे, राजू पिताणी, नितीन पत्की, खा.गीते यांचे बंधू अनिल गीते, प्रकाश ठोंबरे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते या जल्लोषात सहभागी झाले होते. (वार्ताहर)
नागोठण्यात जल्लोषी वातावरण
By admin | Updated: May 17, 2014 01:06 IST