मनोहर कुंभेजकर, मुंबई: उत्तर मुंबईत रखडलेल्या एसआरए प्रकल्पांची यादी तयार करून सर्व प्रकल्प मार्गी लावून हा परिसर झोपडपट्टी मुक्त करण्यात येईल, अशी ग्वाही केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री तसेच उत्तर मुंबईचे खासदार पीयूष गोयल यांनी दिली. कांदिवली पश्चिम येथील डहाणूकर वाडीतील जय संतोषी मा गृहनिर्माण संस्थेच्या एसआरए प्रकल्पाचे उद्घाटन आणि १४९ रहिवाशांना चावी वाटप करण्याचा कार्यक्रम केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते पार पडला. केवळ आर्थिक विकास साधूनच प्रगती होत नाही तर रहिवाशांना मानसिक, शारीरिक आणि आत्मिक सुख देण्यासाठी शेवटच्या पायरीवर उभ्या असलेल्या झोपडीधारकांना हक्काचे पक्के घर द्यावे लागेल. जितक्या लवकर त्यांना आपण उत्तम घर देत नाही तोपर्यंत त्यांचा विकास झाला असे आपल्याला म्हणता येणार नाही, असे ते यावेळी म्हणाले.
हा प्रकल्प ठरलेल्या मुदतीत उत्तमप्रकारे पूर्ण केल्याबद्दल विकासकांचे त्यांनी कौतुक केले. याचवेळी ज्या प्रकल्पांमध्ये विकासकांनी प्रकल्प रखडवले आणि भाडी थकवली, निकृष्ट दर्जाचे काम केले तसेच रहिवाशांना बेघर केले त्यांना ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्यात यावे, अशी सूचना पीयूष गोयल यांनी केली. त्याचप्रमाणे ज्या अधिकाऱ्यांनी अशा विकासकांना साथ देत रहिवाशांसोबत खेळखंडोबा केला त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, प्रसंगी त्यांना तुरुंगात टाकावे अशी सूचना एसआरएच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना केली. रहिवाशांनीच आपापसात त्यांना योग्य वाटत असलेला विकासक पारदर्शीपणे निवडावा. त्यात कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप होऊ नये, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकीर्दीत आवास योजनेअंतर्गत घरे देण्यात आली आणि पुढील पाच वर्षात तीन कोटी कुटुंबियांना मोफत पक्के घर देण्याची योजना सुरू असल्याची माहिती पीयूष गोयल यांनी दिली. यावेळी स्थानिक आमदार योगेश सागर, विकासक रश्मिन रुगाणी, चीफ प्रमोटर अमित यादव, एसआरएच्या अधिकारी स्वप्ना देशपांडे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.