Join us  

उत्तर मुंबई: उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये दोन गट, घोसाळकरही तयारीत

By सीमा महांगडे | Published: April 04, 2024 1:23 PM

Maharashtra Lok sabha Election 2024: उत्तर मुंबई या भाजपच्या बालेकिल्ल्यात केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची उमेदवारी घोषित होऊन पंधरवडा उलटला तरी महाविकास आघाडीकडून उमेदवाराची घोषणा होत नसल्याने तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

- सीमा महांगडेमुंबई - उत्तर मुंबई या भाजपच्या बालेकिल्ल्यात केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची उमेदवारी घोषित होऊन पंधरवडा उलटला तरी महाविकास आघाडीकडून उमेदवाराची घोषणा होत नसल्याने तर्कवितर्कांना उधाण आले आहे. उद्धवसेनेचे नेते माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे नाव पुढे आले असले तरी काँग्रेसमधूनही तयारी सुरू असल्याने गोंधळ कायम आहे.

गोयल यांनी आपल्या प्रचाराचा नारळही वाढविला. मात्र महाविकास आघाडीकडून उमेदवाराची घोषणा झालेली नाही. उद्धवसेनेचे उमेदवार म्हणून विनोद घोसाळकर यांचे नाव जवळपास निश्चित असल्याचे मानले जात आहे. त्याचवेळी काँग्रेसमधील एक गटही निवडणुकीच्या तयारीला लागला आहे. विशेष म्हणजे गेल्या दोन निवडणुकांत काँग्रेसचा येथे मोठ्या फरकाने पराभव झाला आहे. २०१९ च्या निवडणुकीत अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा तब्बल साडेचार लाख मतांनी पराभव झाला होता.

काँग्रेसच्या वाट्याला जागा आली तर आमची तयारी आम्ही सुरू केली आहे. स्थानिक उमेदवार देणार, अशी चर्चा स्थानिक कार्यकर्ते करत आहेत. दुसरीकडे मात्र येथील सामाजिक समीकरणामुळे काँग्रेसचा दुसरा गट उत्तर मुंबई मतदारसंघ घेण्यास उत्सुक नाही. त्यामुळे घोसाळकर कुटुंबीयांमधून उमेदवार दिला जावा, असे मत ते व्यक्त करत आहेत.

काँग्रेसला ही जागा मिळाली तर आम्ही पूर्ण ताकदीने ती लढवणार आहोत. त्यासाठी आम्ही बूथ लेव्हलपासून तयारी केली आहे. राज्यातील आघाडीतील सगळ्यात मोठा पक्ष काँग्रेस असून आमच्या वाट्याला मुंबईतील २ जागा अपेक्षित आहेत. आम्ही दुसऱ्या पक्षासारखा उपरा उमेदवार न देता स्थानिकांना संधी देऊ आणि नागरिकांच्या समस्या सोडवू.- शीतल म्हात्रे, माजी नगरसेविका, काँग्रेस

उत्तर मुंबईचा उमेदवार घोषित झालेला नसला तरी महाविकास आघाडीची निवडणूक लढण्याची तयारी सुरू आहे. युती म्हटल्यानंतर काही गणिते असल्याने अद्याप उमेदवारी जाहीर झाली नाही. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मला पाठिंबा दिला  आहे.- विनोद घोसाळकर, माजी आमदार, उद्धवसेना

टॅग्स :महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४मुंबई उत्तरकाँग्रेस