Join us
Daily Top 2Weekly Top 5

कोविडच्या ३७६ रुग्णांपैकी एकही डेल्टा प्लस नाही....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोविड-१९ विषाणूच्या डेल्टा प्रकाराचा प्रसार होण्याचा धोका वाढला आहे. या विषाणूचे तत्काळ निदान करण्यासाठी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोविड-१९ विषाणूच्या डेल्टा प्रकाराचा प्रसार होण्याचा धोका वाढला आहे. या विषाणूचे तत्काळ निदान करण्यासाठी महापालिकेने कस्तुरबा रुग्णालयात अत्याधुनिक यंत्रणा उभी केली आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात १८८ रुग्णांच्या नमुन्यांपैकी १२८ डेल्टा बाधित होते, तर आता दुसऱ्या टप्प्यात ३७४ नमुन्यांपैकी ३०४ डेल्टाबाधित असल्याचे समोर आले आहे. मात्र, अतिवेगाने लागण होणाऱ्या ‘डेल्टा प्लस’ या उपप्रकारातील एकही नमुना आढळून आलेला नाही, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

या नेक्स्ट जनरेशन जिनोम सिक्वेसिंग प्रयोगशाळेत पहिल्या टप्प्यातील चाचण्यांचे निष्कर्ष गेल्या महिन्यात जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार कोविड बाधा झालेल्या एकूण १८८ रुग्णांपैकी १२८ रुग्ण हे ‘डेल्टा’ बाधित असल्याचे स्पष्ट झाले होते, तर दुसऱ्या टप्प्यात ३७४ नमुन्यांच्या चाचण्यापैकी ३०४ हे ‘डेल्टा’ बाधित आहे. इतर नमुन्यांमध्ये ‘नाईंटीन-ए’ उपप्रकारातील दोन आणि ‘ट्वेंटी-ए’ उपप्रकारातील चार नमुने, उर्वरित ६६ नमुने हे सर्वसाधारण कोविड विषाणूचे आहेत. विशेष म्हणजे पहिल्या व दुसऱ्या अशा दोन्ही टप्प्यांतील नमुन्यांमध्ये अतिवेगाने लागण होणाऱ्या ‘डेल्टा प्लस’ या उपप्रकारातील एकही नमुना आढळून आलेला नाही.

* पहिल्या टप्प्यातील डेल्टा बाधित १२८ नमुन्यांपैकी ९३ नमुने हे मुंबईतील रुग्णांचे होते. या ९३ रुग्णांपैकी ४५ नमुने हे पुरुष रुग्णांचे, तर ४८ नमुने हे स्त्री रुग्णांचे होते.

* ९३ व्यक्तींपैकी ५४ व्यक्तींना म्हणजेच ५८ टक्के व्यक्तींना रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासली, तर उर्वरित ४२ टक्के म्हणजेच ४० व्यक्तींमध्ये कोणतीही लक्षणे आढळून न आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले नाही.

* या ९३ रुग्णांपैकी ४७ रुग्णांनी कोविड प्रतिबंधात्मक लस घेतली होती. ज्यापैकी २० व्यक्तींनी पहिला डोस, तर २७ व्यक्तींनी दोन्ही डोस घेतले होते. उर्वरित ४६ रुग्णांनी लस घेतली नव्हती. लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या चार रुग्णांना ऑक्सिजन पुरवठ्याची गरज भासली.

* या रुग्णांच्या निकटच्या संपर्कातील एक हजार १९४ व्यक्तींची कोविड चाचणी करण्यात आली. ज्यापैकी ८० व्यक्तींना कोविड बाधा झाल्याचे आढळून आले.