Join us
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सवात ऑनलाइन वर्ग नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : गणेशोत्सवासाठी मुंबई, ठाणे परिसरातील पालक, विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कोकणासह राज्यातील अनेक भागांत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : गणेशोत्सवासाठी मुंबई, ठाणे परिसरातील पालक, विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कोकणासह राज्यातील अनेक भागांत मूळ गावी जात असतात. या कालावधीत ऑनलाइन शिक्षणाला ५ दिवस पूर्णपणे सुट्टी जाहीर करावी तसेच या काळात कोणतेही ऑनलाइन वर्ग, परीक्षा अथवा प्रशिक्षणांचे आयोजन करण्यात येऊ नये, अशा प्रकारच्या सूचना सर्व शाळांच्या व्यवस्थापनांना कराव्यात, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने पालिका शिक्षणाधिकारी राजू तडवी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

याआधीही युवासेना सिनेट सदस्यांकडून उपसंचालकांकडे ही मागणी करण्यात आली होती. मात्र सीबीएसई, आयसीएसई व इतर मंडळांच्या शाळांनी विद्यार्थ्यांना केवळ एकाच दिवसाची सुट्टी दिल्याने पालक, विद्यार्थ्यांत नाराजी पसरली आहे.

शासनाच्या सूचनांकडे दुर्लक्ष

८ सप्टेंबर २०१५ च्या शासन निर्णयानुसार राज्यातील धार्मिक सण व उत्सवांच्या कालावधीमध्ये परीक्षा घेणे व शाळांच्या सुट्ट्यांच्या नियोजनाबाबत सविस्तर सूचना दिल्या आहेत. त्यानुसार शिक्षण अधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) यांनी स्थानिक ठिकाणांच्या गरजेनुसार शाळा व्यवस्थापन समिती/पालक शिक्षक संघ यांच्या सहमतीनुसार व शिफारसीनुसार गणेशोत्सव, दिवाळी व अन्य सण, उत्सव कालावधीत चाचणी परीक्षेचे आयोजन करू नये, अशा सूचना दिल्या आहेत. परंतु राज्य मंडळांच्या शाळांव्यतिरिक्त इतर मंडळांच्या शाळांमध्ये या सूचनांचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आले असल्याच्या तक्रारी पालक करीत आहेत.