Join us  

शिक्षेनंतर कुणीही अत्याचाराला धजावणार नाही, कोपर्डी प्रकरणावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2017 2:30 PM

'कोर्टाने दोषींना जास्तीत जास्त शिक्षा करावी,  शिक्षेनंतर कुणीही अत्याचाराला धजावणार नाही', असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलले आहेत.

मुंबई -  कोपर्डी खटल्यातील दोषींना जास्तीत जास्त शिक्षा करावी अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. कोपर्डी खटल्यातील तिन्ही आरोपींना न्यायालयाने दोषी ठरवले आहे. 22 नोव्हेंबरला शिक्षेची सुनावणी होणार आहे.  त्यामुळे या तीनही नराधमांना फाशी की जन्मठेप याचा फैसला आता 22 नोव्हेंबरला होणार आहे. प्रमुख आरोपी पप्पू उर्फ जितेंद्र शिंदे याला अत्याचार खून या कलमांखाली दोषी ठरविण्यात आले आहे, तर आरोपी संतोष भवाळ व नितीन भैलुमे यांना संगनमत करुन कट करणे व गुन्ह्यासाठी प्रोत्साहित करणे यासाठी दोषी ठरवले आहे.

'कोर्टाने दोषींना जास्तीत जास्त शिक्षा करावी,  शिक्षेनंतर कुणीही अत्याचाराला धजावणार नाही', असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलले आहेत. अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपर्डीमध्ये 13 जुलै 2016 रोजी अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन निर्घृण तिची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणानंतर संपुर्ण राज्यात संताप व्यक्त करण्यात आला होता. 

बाललैंगिंक कायद्यानुसारही तिन्ही आरोपींना दोषी ठरविण्यात आले आहे. खून व अत्याचाराच्या गुन्ह्यात फाशी व जन्मठेपेची तरतूद असून, कट रचणे व गुन्ह्यासाठी प्रोत्साहित करणे यासाठी जन्मठेपेची तरतूद आहे, असे न्यायालयाने सांगितले. २१ नोंव्हेबरला नितीन भैलुमे याच्या शिक्षेवर युक्तीवाद करण्यासाठी तर २२ नोव्हेंबरला जितेंद्र शिंदे व संतोष भवाळ यांच्या शिक्षेवर युक्तीवाद करण्यासाठी सुनावणी होणार आहे. यानंतर निकाल सुनावण्यात येईल. 

कोपर्डी अत्याचार व खून प्रकरणात पोलिसांनी मुख्य आरोपी पप्पू ऊर्फ जितेंद्र बाबूलाल शिंदे (वय २९), संतोष गोरख भवाळ (२९) व नितीन गोपीनाथ भैलुमे (२८) यांना अटक करुन त्यांच्याविरोधात सबळ पुरावे मिळवून दोषारोप पत्र ठेवले होते. याची सुनावणी येथील जिल्हा व सत्र न्यायालयात जिल्हा सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांच्या पीठापुढे झाली. आरोपी व सरकारी पक्षाने आपापल्या बाजू मांडल्या असून, साक्षीपुरावे तपासून आज आरोपींवरील दोष सिद्ध होण्यासाठी थोड्याच वेळात सुनावणी होणार आहे. या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर नगर शहर व कोपर्डीत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. 

टॅग्स :कोपर्डी खटलादेवेंद्र फडणवीसन्यायालय