Join us  

आनंद दिघेंना कुणी मारलं वगैरे नाही; नारायण राणेंचा निलेशला झटका

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2019 8:33 AM

गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असलेल्या दिघे मृत्यू प्रकरणावर नारायण राणेंनी अखेर पडदा टाकला आहे.

मुंबईः गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असलेल्या दिघे मृत्यू प्रकरणावर नारायण राणेंनी अखेर पडदा टाकला आहे. शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या हत्येचा कट पूर्वनियोजित असून, त्यांचा रुग्णालयात मृत्यू झाल्याचे भासवण्यात आल्याचा आरोप राणेंचे सुपुत्र निलेश राणे यांनी केला होता. त्या दाव्याचे नारायण राणेंनी खंडन केलं आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आनंद दिघे यांच्या मृत्यूसंदर्भात मध्यंतरी जे काही आरोप झाले, ते मला मान्य नाहीत, असं नारायण राणे म्हणाले आहेत.चुकीच्या गोष्टींचं मी समर्थन करणार नाही, दिघेंचा मृत्यू कोणी मारून झालेला नाही, कारण दिघेंना त्यावेळेला शेवटचा भेटणारा मी होतो, मी निघाल्यानंतर काही क्षणातच त्यांचा प्राण गेला.  आनंद दिघेंचा मृत्यू नैसर्गिक आहे, तो कोणत्याही घातपातामुळे झालेला नाही, हे मला माहीत आहे, असं नारायण राणेंनी सांगितलं आहे. यापुढे या गोष्टी बोलल्या जाणार नाहीत. मी निलेश राणे यांना हे वास्तव सांगेन,” असे विधानही महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केले आहे. साम वृत्तवाहिनीने भाजप-शिवसेना युती झाल्याच्या पार्श्वभूमीवर नारायण राणे यांची विशेष मुलाखत घेतली होती. त्यावेळी त्यांनी दिघेंच्या मृत्यूसंदर्भात केलेल्या प्रश्नाला नारायण राणेंनी हे उत्तर दिले. 

नारायण राणे पुढे म्हणाले की, “मी चुकीच्या आरोपांना कधीच साथ करणार नाही. आनंद दिघेंना शेवटचा भेटणारा मी होतो. मी गेलो तेव्हा दिघे यांची प्रकृती अत्यंत खालावली होती. मी बाहेर पडून बाळासाहेबांना फोन केला आणि डॉ. नितू मांडके यांना पाठवून देण्याची विनंती केली. बाळासाहेबांनी तशी व्यवस्था केली. पण डॉ. नितू मांडके येण्याअगोदरच दिघे यांचा मृत्यू झाला होता. ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे मी बाळासाहेबांवर याबाबत आधी जे आरोप झाले, त्याच्याशी सहमत नाही,”, असे नारायण राणे म्हणाले.

टॅग्स :नारायण राणे निलेश राणे