Join us

विजेसाठी ‘ना हरकत’ प्रमाणपत्र बंधनकारक

By admin | Updated: August 1, 2015 01:40 IST

न्यायालयाच्या आदेशनानंतर आधीच धास्तावलेल्या गणेश मंडळांची धाकधूक अजूनही कमी झालेली नाही. आता बेस्टकडून वीजेसाठी मंडळांची अडवणूक होत असल्याचे समोर येत आहे.

मुंबई : न्यायालयाच्या आदेशनानंतर आधीच धास्तावलेल्या गणेश मंडळांची धाकधूक अजूनही कमी झालेली नाही. आता बेस्टकडून वीजेसाठी मंडळांची अडवणूक होत असल्याचे समोर येत आहे. वीज हवी असल्यास पालिका आणि पोलिसांचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ आणा, असे फर्मान बेस्टने मंडळांना सोडले आहे. रस्ते अथवा फुटपाथवर सार्वजनिक गणेशोत्सवाचा मंडप उभारणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना वीजेसाठी बेस्टच्या पायऱ्या झिजवाव्या लागण्याची शक्यता आहे. महापालिकेचे मंडपासाठीचे ‘ना हरकत’ प्रमाणपत्र आणि संबधित पोलीस ठाण्याच्या परवानगीची यंदाची अथवा गतवर्षीची प्रत आणि यंदा पोलीस ठाण्यात अर्ज केलेल्या पोचपावतीची प्रत वीजे जोडणीसाठी आवश्यक करण्यात आली आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळासाठी बेस्टने विशेष त्रिस्तरीय योजना आखली आहे. या योजनेत विद्युत रोषणाईसाठी ‘एक खिडकी योजने अंतर्गत’ तात्पुरता वीजपुरवठा देणे, मार्ग प्रकाश योजनेद्वारे विसर्जनावेळी खास प्रकाश योजना करणे आणि अत्याधुनिक संपर्क सुविधा कार्यान्वित करणे, याचा समावेश आहे. प्रत्येक प्रभागासाठी उपक्रमाची ९ ग्राहकसेवा विभागाची कार्यालये कार्यान्वित करण्यात आली आहेत.सार्वजनिक गणेशोत्सवादरम्यानच्या वीज पुरवठ्यासाठी मंडळांनी मागणी अर्ज किमान दहा दिवस आधी सादर करावा, असे आवाहन बेस्टने केले आहे. ज्या ठिकाणी मंडपाची व्यवस्था करण्यात येणार आहे; त्या जागेच्या मालकाची परवानगी आवश्यक आहे. विद्युत निरीक्षकाच्या परवानीची प्रतही आवश्यक आहे. तात्पुरता मीटर आवश्यक असल्यास त्याच केबिनमधील कुठल्याही एका मीटरचे चालू वीज बील जोडणे आवश्यक आहे. कायमस्वरुपी वीज बील असणाऱ्या व्यक्तीची स्वाक्षरी असलेले हमीपत्र आवश्यक आहे. मागील वर्षीची वीज थकबाकी भरणे आवश्यक आहे, अशा अनेक अटी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना लागू करण्यात आल्या असून, त्यांचे त्यांनी पालन करावे, असे बेस्टने म्हटले आहे. (प्रतिनिधी)बेस्टच्या मंडळांना सूचना- मंडपांमधील वायरिंग मान्यताप्राप्त विद्युत ठेकेदराकडून करून घ्यावे.- ओल्या जमिनीवरुन वीजेच्या तारा टाकू नये.- दिव्याच्या खांबांना वायरी गुंडाळू नये.- वायरचे जोड सुरक्षित करून घ्यावेत.- चोरीची वीज वापरू नये.- वीज पुरवठा खंडित झाल्यास उपक्रमाला त्वरित माहिती द्यावी.- सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी वीजेचा दर (१ एप्रिल २०१५ च्या दरपत्रकाप्रमाणे प्रतियुनिट) - ४ रुपये ९० पैसे