Join us

पांडवकड्यावर यंदाही पर्यटकांना ‘नो एन्ट्री’

By admin | Updated: June 9, 2015 01:21 IST

नवी मुंबईसारख्या सिमेंटच्या जंगलात खारघर शहरामधील नैसर्गिक पांडवकडा धबधबा पर्यटकांना नेहमीच आकर्षित करतो.

वैभव गायकर, पनवेलनवी मुंबईसारख्या सिमेंटच्या जंगलात खारघर शहरामधील नैसर्गिक पांडवकडा धबधबा पर्यटकांना नेहमीच आकर्षित करतो. मुंबई, उपनगर, ते कल्याण, ठाणे तसेच रायगड जिल्ह्यातील पर्यटकांच्या पसंतीस उतरलेल्या या धबधब्यावर सुरक्षेच्या कारणावरून यंदाही वन खात्याने बंदी घातल्याने पर्यटकांचा हिरमोड होणार आहे. खारघरमधील पांडवकडा धबधब्यावर दरवर्षी हजारो पर्यटक येतात. मात्र अतिउत्साहाच्या भरात किंवा हलगर्जीपणामुळे अनेक वेळा याठिकाणी अपघात घडले आहेत आणि अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळेच वनखात्याने याठिकाणी पर्यटकांना येण्यास मज्जाव केला आहे. गतवर्षी याठिकाणी बुडून एका पर्यटकाला आपला जीव देखील गमवावा लागला होता. वनविभागाने पांडवकडा धबधब्याच्या परिसरात विविध कामे देखील केली आहेत. त्यामध्ये नेचरपार्कअंतर्गत प्रस्तावित कामांपैकी जल व मृद संधारण, दगडी नालाबांधणीच्या कामांचा समावेश आहे. एकूण प्रस्तावित क्षेत्रांपैकी ५५० हेक्टर क्षेत्रावर २४,५९८ घ.मी. नाला बांधण्यात आला आहे. दगडी नाला बांधण्याच्या कामामुळे उतारावरून येणाऱ्या पाण्याचा वेग कमी होवून पाण्यासोबत येणारी माती अडविली जाते. सिमेंट बंधारे पांडवकडा धबधब्यात येणारे जास्तीत जास्त पाणी अडविणार असल्याने धबधब्याचे अस्तित्व चिरकाळ टिकेल.पर्यटकांच्या सुरक्षेसाठी वनविभागाच्या वतीने याठिकाणी सिमेंटची भिंत उभारण्याच्या कामाला सार्वजनिक बांधकाम विभागाकडे २९ लाख रुपयांचा निधी सहा महिन्यापूर्वीच देण्यात आला आहे. त्या संरक्षण भिंतीचे काम पूर्ण झाले नसल्यामुळेच यंदा पांडवकडा धबधब्यावर पर्यटकांना प्रवेश नाकारण्यात आला आहे. वनविभागाच्या या निर्णयावर अनेक पर्यावरणप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. पांडवकडा धबधबा हा नवी मुंबईमधील आकर्षणाचा केंद्रबिंदू असताना त्याठिकाणी प्रवेश नाकारणे हे चुकीचे असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे. गेल्या महिन्यात पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी पांडवकडा धबधब्याची पाहणी करुन याठिकाणच्या परिसराची माहिती वनाधिकाऱ्यांकडून घेतली होती. तसेच पांडवकडा धबधब्याला पर्यटन क्षेत्राचा दर्जा देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र वनविभागाने पर्यटकांसाठी प्रवेश बंद केल्यानेच याठिकाणच्या पर्यटन क्षेत्राला चालना कशी मिळणार असा प्रश्न यावेळी उपस्थित होत आहे . संरक्षण भिंतीचे काम अपूर्णच्वनविभागाने धबधबा परिसरात संरक्षण भिंत उभारण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहे. त्याकरिता सहा महिन्यांपूर्वीच २९ लाख रुपयांचा निधी सार्वजनिक बांधकामाला वर्ग करण्यात आला आहे. च्मात्र हे काम पूर्ण झाले नसल्यामुळेच आम्हाला धबधब्यावर पर्यटकांना प्रवेश बंद करावा लागला आहे. पर्यटकांच्या जीव धोक्यात जाऊ नये म्हणून आम्ही हे पाऊल उचलले आहे. च्पर्यटकांनी नियमांचे उल्लंघन करू नये. याठिकाणी बंदोबस्तासाठी खारघर पोलिसांची मदत घेतली जाणार असून वनविभागाचे कर्मचारी उपस्थित राहतील, असे पनवेलचे वनपरीमंडळ अधिकारी निलेश भुजबळ यांनी सांगितले.