मुंबई : मुंबईतील आरटीओंना दलालांचा विळखा बसला असून, त्यातून सुटका करण्यासाठी आता ताडदेव आरटीओने कठोर उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे. दलालांना नो एन्ट्री करण्यात आली असून, यासाठी विशेष अधिकारीच नियुक्त करण्यात आले आहेत. मुंबईत शहर आणि उपनगरात ताडदेव, अंधेरी, वडाळा असे तीन आरटीओ आहेत. नवीन लायसन्स काढणे, त्याचे नूतनीकरण करणे, नवीन वाहनांची नोंदणी करणे अशी अनेक कामे आरटीओत केली जातात. मात्र हे दलाल ही कामे लगेच करुन देण्याचे आश्वासन नागरिकांना देतात. तसेच ही कामे पार पाडण्यासाठी आरटीओत प्रवेश करून कर्मचाऱ्यांनाही त्याचे आमिष दाखवतात. या सर्व बाबी पाहता ताडदेव आरटीओकडून दलालांना नो एन्ट्री करण्यासाठी उपाययोजनाच करण्यात आली आहे. कारणाशिवाय आरटीओत येणाऱ्यांचाही भरणा अधिक असतो. यात दलालही असतात. त्यामुळे दलाल आणि कारणाशिवाय येणाऱ्यांना आळा घालण्यासाठी कार्यालयाच्या मेन गेटवर तीन अधिकाऱ्यांसह दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे ताडदेव आरटीओ अधिकारी के.टी. गोलानी यांनी सांगितले. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून प्रत्येकाची चौकशी करतानाच त्यांची रजिस्टर्डमध्ये नोंदही केली जाणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे आरटीओ कार्यालयाच्या परिसरात अन्य व्यक्ती गाड्या पार्क करून बाहेर फिरायला जातात. अशा अनेक घटना उघडकीस आल्या असून, त्यालाही आळा घालण्यात येणार आहे. यासाठी पोलीस आणि वाहतूक पोलिसांची मदत घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)
आरटीओत दलालांना नो एन्ट्री
By admin | Updated: October 6, 2014 03:43 IST