मुंबई : तोकडे कपडे घालून प्रवास करू इच्छिणाऱ्या एका तरुणीला ‘इंडिगो’ विमानाने अटकाव केल्याची घटना मुंबईत घडली. तरुणी मुंबईहून दिल्ली येथे जाणाऱ्या विमानाने प्रवास करणार होती. मात्र, तिने परिधान केलेल्या तोकड्या कपड्यांवर विमानाच्या कर्मचाऱ्यांनी आक्षेप घेत प्रवासाला नकार दिला.दरम्यान, या तरुणीसोबत असणाऱ्या एका प्रवाशाकडील माहितीनुसार तिने परिधान केलेल्या कपड्यांत अश्लीलता नव्हती. तिने गुडघ्यापर्यंत कपडे परिधान केले होते. मात्र, तरीही तिला अडविण्यात आले. अखेर जेव्हा ती कपडे बदलून आली, तेव्हा तिला दुसऱ्या विमानाने दिल्ली येथे पाठवण्यात आले. या विषयी ‘इंडिगो एअरलाईन्स’ दिलेल्या स्पष्टीकरणानुसार, कंपनीच्या कर्मचाऱ्यांना लागू असलेल्या नियमांचे कारण देण्यात आले आहे. संबंधित तरुणी ही ‘इंडिगो’ कंपनीची माजी कर्मचारी असून, तिची बहीण सध्या येथे कार्यरत आहे. कंपनीच्या नियमावलीनुसार, कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय सवलती अंतर्गत प्रवास करत असल्यास, कंपनीच्या ड्रेसकोडचे नियम बंधनकारक असल्याचा दावा कंपनीने केला आहे. (प्रतिनिधी)
तोकडे कपडे घातल्याने तरुणीला विमानात ‘नो एन्ट्री’!
By admin | Updated: October 30, 2015 09:09 IST