मुंबई: गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि दिल्लीतील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. गेले अनेक दिवस मुंबईत मुंबईत हजारपेक्षा कमी कोरोना रुग्ण आढळून येत होते. मात्र आज हा आकडा हजारच्या पुढे गेला आहे. तर दिल्लीतही कोरोनाची तिसरी लाट आली आहे. दिल्लीत दररोज कोरोनाचे सात हजारांहून अधिक रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे दिल्ली-मुंबई दरम्यानची रेल्वे सेवा बंद करण्यात येणार असल्याची चर्चा सुरू झाली. यावर रेल्वे मंत्रालयानं स्पष्टीकरण दिलं आहे.दिल्ली-मुंबई दरम्यानच्या अनेक रेल्वे गाड्यांच्या फेऱ्या रद्द होणार असल्याचं वृत्त काही माध्यमांनी दिलं. मात्र रेल्वेनं असा कोणताही निर्णय घेतला नसल्याचं रेल्वे मंत्रालयानं ट्विट करून स्पष्ट केलं आहे. दिल्ली-मुंबई दरम्यानची हवाई आणि रेल्वे वाहतूक बंद करण्याचा निर्णय एक ते दोन दिवसांत घेतला जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यावर रेल्वे मंत्रालयानं स्पष्टीकरण दिलं आहे.
वाढत्या कोरोना रुग्णांमुळे मुंबई-दिल्ली रेल्वेसेवा बंद होणार?; रेल्वे मंत्रालय म्हणतं...
By कुणाल गवाणकर | Updated: November 20, 2020 20:56 IST